नांदेड : महापालिकेने १६ आॅगस्टपासून चार दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला असून नांदेडकरांना पुन्हा आठ दिवसानंतरच पाणी मिळणार आहे़ दुसरीकडे जायकवाडीचे पाणी मिळण्याची शक्यताही मावळली आहे़ त्यामुळे पाणीटंचाईचे संकट कायम आहे़महापालिकेच्या स्थायी समिती सभेत महापौर व सभापतींनी पाणी पुरवठा विभागाला १६ आॅगस्टपासून चार दिवसांआड पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर काही वेळातच हा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़ त्यामुळे आता नांदेडकरांना चार दिवसआड नव्हे तर सहा दिवसआड पाणी मिळणार आहे़
शहरात मागील चार महिन्यांपासून आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे़ जून, जुलै महिन्यात केवळ तीन ते चार दिवसांआड पाणी सोडण्यात आले होते़ सध्या विष्णूपुरी प्रकल्पात १६़९३ दलघमी साठा उपलब्ध आहे़ त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी चार दिवसांआड पाणी सोडण्याचा निर्णय आयुक्त लहुराज माळी यांनी जाहीर केला होता़ यासंदर्भात १५ आॅगस्ट रोजी वृत्तपत्रातून जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली होती़ मात्र त्यानंतर काही वेळातच हा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़ त्यामुळे आता नांदेडकरांना चार दिवसआड नव्हे तर सहा दिवसआड पाणी मिळणार आहे़ काही भागात सातव्या, आठव्या दिवशीही पाणी सोडण्यात येत आहे़ पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून रात्री- बेरात्री नळाला पाणी सोडले जात आहे़ त्यामुळे नागरिकांना नळाचे पाणी मिळत नाही़ भर पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ काही भागात टँकरही सात, आठ दिवसानंतर येत असून त्यावर पाण्यासाठी झुंबड उडत आहे़
जायकवाडी धरणात १६ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत १९९३़६८६ दलघमी जिवंत पाणीसाठा उपलब्ध असून धरणाची टक्केवारी ९१़८३ एवढी आहे़ या धरणातून उजवा कालव्यात ९०० क्यूसेस तर डाव्या कालव्यात १४०० क्यूसेस विसर्ग सुरू आहे़ पैठण जलविद्युत केंद्रामधून १५८९ क्युसेस विसर्ग सुरू आहे़ ढालेगाव बंधाऱ्यापर्यंत हे पाणी मिळणार आहे़ मात्र त्यापुढे विष्णूपुरी प्रकल्पापर्यंत पाणी मिळण्याची शक्यता कमीच आहे़ गोदावरी नदीपरिक्षेत्रातील पाऊसही बंद झाला आहे़ विष्णूपुरी प्रकल्पासह जिल्ह्यातील मध्यम, लघु व मोठ्या बंधाऱ्याची स्थिती नाजूक आहे़ अर्धा पावसाळा संपला असून यापुढे जोरदार पाऊस झाला तरच प्रकल्पाचा साठा वाढण्याची शक्यता आहे़ मात्र या जर, तरच्या बाबी असून उपलब्ध साठ्यावरच पुढील चार महिने काढावे लागणार आहेत़ त्यासाठी मनपाने चार दिवसांआड पाणी सोडण्याचा निर्णय रद्द केला आहे़ प्रशासनाने पाणीपुरवठ्याच्या बाबतीत गंभीर नियोजन करावे, अशी मागणी करण्यात येत आहे़
सध्या शहराला सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ विष्णूपुरी प्रकल्पात २० टक्के साठा उपलब्ध असून या पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल़ सध्या विष्णूपुरी प्रकल्पातून ५० टक्के उपसा सुरू आहे़ सांगवी बंधाऱ्यातील पाण्यावरच पाणीपुरवठा सुरू आहे़ मराठवाड्यात कमी पाऊस झाल्यामुळे धरणांची स्थिती नाजूक आहे़ त्यामुळे इतर शहरात १० ते १५ दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात आहे़ नांदेडमध्ये चार दिवसांआड पाणी सोडण्याचे नियोजन केले होते़ मात्र वरिष्ठांच्या निर्णयानुसार तो निर्णय रद्द करण्यात आला आहे़ - सुग्रीव अंधारे,कार्यकारी अभियंता महापालिका