नांदेड : कोरोना प्रादुर्भावामुळे मागील वर्षी राज्यातील देशांतर्गत विमान सेवा मोठ्या प्रमाणात खंडित झाली होती. त्यामुळेच राज्यातील हवाई प्रवासी संख्येतही २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये घट झाली आहे. मात्र त्यानंतरही शिर्डी, कोल्हापूरसह नांदेड येथील प्रवासी संख्या वाढल्याचे चित्र आहे. नांदेडमध्ये २०१९ मध्ये १ लाख १८ हजार प्रवाशांनी हवाई सेवेचा लाभ घेतला होता. २०२० मध्ये हीच संख्या १ लाख ३७ हजारांवर पोहोचली आहे.
कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे मागील वर्षी अनेक ठिकाणची देशांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळेच हवाई प्रवाशांच्या संख्येवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये राज्यात १ कोटी ४६ लाख ३३ हजार प्रवाशांनी देशांतर्गत विमान सेवेचा लाभ घेतला होता. २०२० मध्ये या प्रवासी संख्येत घट झाली असून ती संख्या १ कोटी २५ लाखांवर आली आहे. मात्र अशा विपरीत परिस्थितीतही नांदेडमधील हवाई प्रवाशांची संख्या वाढल्याचे सकारात्मक चित्र आहे.
नांदेड विमानतळावरून सध्या एअर इंडियाची नांदेड-अमृतसर, नांदेड-दिल्ली आणि नांदेड-चंदीगड ही प्रवासी सेवा सुरू आहे. याबरोबरच नांदेड-हैद्राबाद आणि नांदेड-मुंबई अशी टू जेटच्या माध्यमातून दररोज सेवा देण्यात येते. नांदेड येथे सचखंड गुरुद्वारा असल्याने दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक नांदेडला येत असतात. याबरोबरच नांदेड शेजारील हिंगोली, परभणी, यवतमाळ आणि लातूर या जिल्ह्यातील नागरिकही नांदेड येथूनच विमान प्रवास करण्यास पसंत देत असल्याने नांदेडमधील हवाई प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. कोरोना प्रादुर्भावामुळे देशांतर्गत सेवा बंद केल्यानंतर नांदेड-अमृतसरसह इतर उड्डाणेही थांबली होती. मात्र मध्यंतरी प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर यातील बहुतांश सेवा पूर्ववत झाल्या आहेत.
चौकट.............
औरंगाबादेतील प्रवासी संख्येतही किंचित घट
२०१९ मध्ये शिर्डी विमानतळावरून २ लाख २९ हजार प्रवाशांनी उड्डाण घेतले होते. यात २०२० मध्ये मोठी वाढ झाली असून ५ लाख ६९ हजार प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला. कोल्हापूरमध्येही २०१९ मध्ये १८ हजार प्रवाशांनी विमानसेवेला प्राधान्य दिले होते. यामध्ये वाढ होत २०२० मध्ये १ लाख ३१ हजारावर प्रवासी संख्या पोहोचली. तीच बाब नाशिकच्या बाबतीत नाशिक ओझर येथून २०१९ मध्ये ४४ हजार प्रवाशांनी उड्डाण घेतले होते. २०२० मध्ये ही संख्या १ लाख २ हजारांवर पोहोचली. दुसरीकडे मुंबई, पुण्यासह औरंगाबादेतील देशाअंतर्गत प्रवासी संख्येत २०१९ च्या तुलनेत घट झाली आहे. २०१९ मध्ये औरंगाबाद येथील ३ लाख ४७ हजार प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला. २०२० मध्ये ही संख्या ३ लाख ४६ हजार झाली आहे.