नांदेड : शहराला पाणीपुरवठा करणार्या विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ८ टक्के पाणी उरल्याने चिंताक्रांत झालेल्या नांदेडकरांची उन्हाळ्याचे आगामी तीन महिने पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. दिग्रस बंधार्यातून सोडलेल्या २० दलघमी पाण्यापैकी १९ दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पात दाखल झाले आहे. प्रकल्पातील जलसाठा आता २५ दलघमीवर पोहोचला आहे.
शहराला विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. सिंचनासाठी सोडलेले पाणी आणि प्रकल्पातून शेतीसाठी अनधिकृतपणे अमर्याद होणारा उपसा यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट झाली. आठ दिवसांपूर्वी केवळ ८ टक्के पाणी उरले होते. परिणामी नांदेडकरांवर जलसंकट ओढवले होते. यावर तोडगा काढण्यासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे आणि परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दिग्रस बंधार्यातून नांदेडसाठी राखीव असणारे २० दलघमी पाणी रविवारी सकाळी विष्णूपुरी प्रकल्पात सोडण्यात आले होते. हे पाणी रविवारी रात्री प्रकल्पात येण्यास सुरुवात झाली. सोमवारी दुपारपर्यंत २० पैकी १९ दलघमी पाणी विष्णूपुरीत दाखल झाले होते. पूर्वी असलेला ५.७५ दलघमीचा जलसाठा आणि प्राप्त झालेला जलसाठा असा एकूण २५ दलघमी जलसाठा आजघडीला विष्णूपुरीत झाला आहे. त्यामुळे आगामी तीन महिने नांदेडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. त्यातही आता सिंचनासाठीच्या पाण्याचे नियोजन आणि बाष्पीभवन तसेच पाणीचोरी यावरही आता नजर ठेवणे आवश्यक आहे.
दोन दिवसांआडच पाणीपुरवठाविष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला २५ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला असला तरीही आगामी काळातील नियोजनासाठी शहराला दोन दिवसांआडच पाणीपुरवठा होईल, असे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. हा पाणीसाठा जून अखेरपर्यंत जपून वापरावा लागणार आहे. त्यानंतर पावसाळा लांबला तर अडचण होऊ नये, ही बाबही विचारात घेण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.