लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : सरकारच्या विधि व न्याय विभागाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा सरकारी अभियोक्ताची नेमणूक केली जाते़ हे पद अर्धा दिवसही रिक्त राहू नये असा दंडक आहे़ परंतु, अत्यंत महत्त्वाच्या या पदाबाबत विधि व न्याय विभागाला गांभीर्य नसल्याचेच दिसून येत असून गेल्या १९ दिवसांपासून हे पद रिक्त आहे़ त्यामुळे अनेक महत्त्वाच्या खटल्यावर त्याचा परिणाम होत आहे़तत्कालीन जिल्हा संघचालक अॅड़अमरिकसिंघ वासरीकर यांची दोन वर्षांपूर्वी जिल्हा अभियोक्ता पदावर नेमणूक करण्यात आली होती़ गेले दोन वर्षे तेच या पदावर होते़ १४ आॅगस्ट रोजी मात्र त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला़ अॅड़ वासरीकर यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी नवीन व्यक्तीची जिल्हा अभियोक्तापदी निवड होणे किंवा वासरीकर यांना मुदतवाढ मिळणे अपेक्षित होते़परंतु, सरकारने यापैकी काहीही केले नाही़ विशेष म्हणजे, वासरीकर यांनी पदभार कुणाकडे सुपूर्द करावयाचा याचेही आदेश मिळाले नाहीत़ त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे़ त्यामुळे गेल्या १९ दिवसांपासून हे पद रिक्तच आहे़ शासनाची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी विविध कायदेशीर विषयांत मार्गदर्शन घेण्यासाठी जिल्हा सरकारी अभियोक्त्याकडेच जावे लागते़परंतु, हे पदच रिक्त असल्यामुळे मोठी अडचण झाली आहे़ नांदेडच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे दिवस जिल्हा सरकारी अभियोक्ता पद रिक्त असल्याचे बोलले जात आहे़ आता या पदावर नियुक्तीसाठी जाहिरात देवून अर्ज मागवावे लागणार आहेत़ त्यानंतर मुलाखतीमधून अभियोक्त्याची निवड केली जाईल किंवा एखाद्याकडे त्याचा पदभार देण्यात येईल़
पद रिक्त ठेवताच येत नाही-अॅड़ शिंदेजिल्हा सरकारी अभियोक्ता हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे़ जिल्ह्यातील खटल्यांची रुपरेषा ठरविणे, त्याचे नियोजन करणे, कामाचे वाटप करणे, खटल्यांमध्ये शासनाची बाजू मांडणे यासह इतर अनेक महत्त्वाची कामे सरकारी अभियोक्ताला करावी लागतात़ त्यामुळे अर्धा दिवसही हे पद रिक्त ठेवता येत नाही़ परंतु, गेल्या १९ दिवसांपासून हे पद रिक्त आहे़ सरकारच्या वतीने जाहिरात दिल्यानंतर आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातात़ त्यानंतर या पदाची नियुक्ती केली जाते, अशी प्रतिक्रिया माजी जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड़ बालाजी शिंदे यांनी दिली़