नांदेड : दक्षिण भारतातील गंगा म्हणून ओळखली जाणारी नांदेडची गोदावरी नदी प्रदूषणामुळे संकटात सापडली आहे. शहरातील ड्रेनेजचे दूषित पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे तर दुसरीकडे नदीतील गवत, झाडे, गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले असून, जलचर प्राण्यांचा मृत्यू होत आहे तसेच पाणीही दूषित होत आहे. गोवर्धन घाट ते वाजेगावपर्यंत असलेल्या नदीपात्रात घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. या नदीपात्रातील पाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळ दर महिन्याला तपासणीसाठी औरंगाबादला पाठवते. पण हे आता नावालाच राहिले आहे. पावसाळा जवळ येत असून, अद्यापही नांदेडमधील गोदावरीच्या स्वच्छतेबाबत कोणतीही तयारी करण्यात आली नसल्याचे दिसत आहे.
गोदावरीच्या पात्राकडे अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे गोदावरीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. गुरूत्ता - गद्दी सोहळ्यानिमित्त नदीकाठाचे सुशोभिकरण करण्यात आले. मात्र, गोदावरीच्या स्वच्छतेची काळजी घेण्यात आली नाही. या नदीपात्रात वाळू माफियांचा सुळसुळाट असून, २४ तास वाळूचा उपसा या नदीतून होत असल्याने नदी परिसर अधिकच प्रदूषित झाला आहे.
चौकट-
पर्यावरण जपणे म्हणजे वसुंधरेचे अस्तित्व जपणे होय. पर्यावरण जपण्यासाठी वृक्षांची लागवड, नदी परिसरातील स्वच्छता व कमी प्रमाणात वाळू उपसा या बाबींकडे जिल्हा प्रशासनाने गंभीररित्या लक्ष देणे आवश्यक आहे. गोदावरी परिसरात पिंपळ, चिंच, वड अशा वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
चौकट-
शहरात महत्त्वाचे तीन मत्स्य बाजार असून, त्यात बुधवार बाजार, इतवारा बाजार व शुक्रवार बाजार आहेत. पावसाळ्यात नदीकाठच्या भागात दीडशे ते दोनशे टन स्थानिक मासळी बाजारात येते. सध्या १ टन मासे बाजारात येत आहेत.