नांदेड: खासदार हेमंत पाटील यांनी शासकीय रूग्णालयात धाव घेत अतिगंभीर असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांची भेट घेवून त्यांना धीर दिला. तसेच रूग्णालयातील अधिकारी, डॉक्टरांकडून सध्याची परिस्थितीची माहिती घेतली. तद्नंतर रूग्णालयातील स्वच्छतागृहांची पाहणी करताना घाण आढळून आल्याने संतापलेल्या खासदार पाटील यांनी अधिष्ठाता अन् अधिकाऱ्यांना तेथील टॉयलेट साफ करायला लावले.
येथील शासकीय रूग्णालय व महाविद्यालय प्रशासनाच्या अनास्थेने तब्बल ३१ जणांचे बळी घेतले आहेत. यामध्ये १६ नवजात बालकांचा समावेश आहे. अतिदक्षता विभागातील घाण, एससी, पंखे बंद अशा असुविधा आणि वेळेत औषधांचा तुटवडा यामुळेच मृत्यूचा आकडा वाढत आहे. मृत्यूचे तांडव घडूनही रूग्णालय प्रशासन आणि शासन झोपेतच असून मंगळवारीदेखील रूग्णांच्या नातेवाईकांना औषधांसाठी बाहेरच्या खासगी मेडिकलची वाट धरावी लागली.
मृत्यूचे तांडव, तरीही निर्दयी प्रशासन झोपेतचविष्णुपूरी येथील कै.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या एनआयसीयु व आयसीयुमध्ये नवजात बालकांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांची वाणवा आहे. या वार्डातील एसी गत अनेक महिन्यांपासून बंद आहे. विशेष म्हणजे, मागील ४८ तासांत ३१ पैकी तब्बल १६ नवजात बालकांचा मृत्यू होवूनदेखील वातानुकुलित कक्षातील एसी अथवा पंखे सुरू करण्यात आलेले नाहीत. त्या उलटचे चित्र म्हणजे, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनात एसीसह पंखे कायम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
चिठ्ठया बाहेर देणे सुरूच...शासकीय रूग्णालयातील ओपीडीचे शुल्क माफ केल्याचा गवगवा करणाऱ्या सरकारने गोरगरीब रूग्णांसाठी मुबलक औषधीसाठी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून गोरगरीबांना मोफत उपचाराच्या करोडोंच्या जाहीराती केल्या जातात. परंतु, प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. नांदेडच्या शासकीय रूग्णालयात मृत्यूचे सत्र सुरूच असताना शासनाकडून अद्यापही कोणताच औषधीसाठा पाठविण्यात आलेला नाही. उलट रूग्णांना चिठ्ठी देवून खासगीतून औषधी, गोळ्या आणि महागडी इंजेक्शन खरेदी करून आणायला लावली जात आहेत.
तीन दिवसानंतर आयसीयुमध्ये झाली स्वच्छता...मागील दोन दिवसात ३१ जणांचा मृत्यू होवूनही प्रशासनाकडून स्वच्छतेकडे दुर्लक्षच केले जात आहे. दरम्यान, मंगळवारी पहाटेपासून स्वच्छता करण्यात येत आहे. नवजात बालक अतिदक्षता विभागात शेकडो किला केरकचरा निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशीच परिस्थिती इतर वार्डातील आहे. केवळ वैद्यकीय शिक्षण मंत्री, पालकमंत्री आणि चौकशी समिती येत असल्याने हा खटाटोप सुरू असल्याचा आरोप रूग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.