लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: नाशिक येथे महावितरण कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवित जिल्ह्यातील १४ जणांना ५० लाख ५० हजारांचा गंडा घालणा-या आरोपी नवलचंद जैन याला शुक्रवारी नांदेड न्यायालयात हजर करण्यात आले होते़ यावेळी न्यायालयाने जैन याला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़महावितरणमध्ये नोकरीला असून कंपनीतील अनेक वरिष्ठ अधिकाºयांची आमची चांगली ओळख आहे़ कंपनीत अनेक जागांची भरती असून त्यातील २० जागांचा कोटा आम्हाला मिळाला असल्याची थाप नवलचंद जैन व त्याच्या पत्नीने अनेक बेरोजगारांना घातली. वीज कंपनीत शिपाई पदासाठी तीन लाख, लिपिक पदासाठी चार लाख तर कनिष्ठ अभियंता पदासाठी आठ लाख रुपये भरावे लागतील, असे सांगून या दाम्पत्याने अनेकांकडून पैसेही उकळले. आपला विश्वास बसावा म्हणून नोकरी न लागल्यास आपल्या नावावरची जमीन तुमच्या नावावर करुन देतो असे आश्वासनही दिले होते़ त्यामुळेच अनेक बेरोजगार नोकरीच्या आशेने या दाम्पत्याच्या आमिषाला बळी पडले. जिल्ह्यातील तब्बल १४ जणांनी ५० लाख ५० हजार रुपये त्याच्याकडे जमा केले होते़ ही रक्कम जमा होताच नवलचंद जैन याने नांदेडमधून नाशिकला पलायन केले़ याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात ९ आॅगस्ट रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता़नवलचंद जैन याच्या पत्नीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता़ न्यायालयाने तो अर्ज फेटाळत सात दिवसांत ठाण्यात हजर होण्याचे आदेश दिले होते़त्यानुसार नवलचंद जैन हा गुरुवारी भाग्यनगर पोलिसांना शरण आला होता़ त्याला शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले़ यावेळी न्यायालयाने नवलचंद जैन याला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़
नोकरीचे आमिष दाखवून गंडविणारा नांदेडच्या पोलीस कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 1:01 AM