नांदेड : मनमाड ते जळगाव दरम्यान घेतलेल्या लाइन ब्लॉकमुळे नांदेड विभागातून धावणाऱ्या नंदीग्राम, अजिंठा आणि जनशताब्दी एक्स्प्रेस या रेल्वे गाड्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान रद्द केल्या आहेत. तर काही रेल्वे गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.
जळगाव ते मनमाड दरम्यान मनमाड येथे तिसऱ्या लाइनचे काम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नॉन इंटरलॉक ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द केल्या असून, काही अंशत: रद्द केल्या आहेत. काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
नांदेड - एलटीटी मुंबई (०७४२६) ही रेल्वे १४ ऑगस्ट रोजी, एलटीटी मुंबई - नांदेड (०७४२७) ही रेल्वे १५ ऑगस्ट रोजी, सीएसटी मुंबई - आदिलाबाद (११४०१) ही नंदीग्राम एक्स्प्रेस १३ व १४ ऑगस्ट रोजी, आदिलाबाद - सीएसटी मुंबई (११४०२) नंदीग्राम एक्स्प्रेस १४ व १५ ऑगस्ट रोजी आणि सीएसटी मुंबई - जालना (१२०७१) जनशताब्दी एक्स्प्रेस १३ व १४ ऑगस्ट रोजी, जालना - सीएसटी मुंबई (१२०७२) जनशताब्दी एक्स्प्रेस १४ व १५ ऑगस्ट रोजी रद्द केली आहे.
त्याचप्रमाणे सिकंदराबाद - मनमाड (१७०६४) ही अजिंठा एक्स्प्रेस १३ आणि १४ ऑगस्ट रोजी नगरसोल ते मनमाड दरम्यान रद्द केली आहे. परतीच्या प्रवासात मनमाड - सिकंदराबाद (१७०६३) अजिंठा एक्स्प्रेस १४ आणि १५ ऑगस्ट रोजी मनमाड ते नगरसोल दरम्यान रद्द केली आहे.
सचखंडच्या मार्गात बदलतसेच नांदेड - अमृतसर (१२७१५) आणि अमृतसर - नांदेड (१२७१६) या सचखंड एक्स्प्रेसच्या मार्गात १४ ऑगस्ट रोजी बदल केला आहे. पूर्णा, अकोला, भुसावळ, खंडवा या मार्गाने ही रेल्वे धावेल.