नंदुरबार : महावितरण कंपनीचे ४३ हजार रुपये किमतीचे पाच लोखंडी खांब आणि तीन स्टॅण्ड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मावचीफळी, ता. नवापूर शिवारात घडली. याबाबत नवापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीजखांबावरील तारा तोडून त्या चोरून नेण्याचे प्रकार सुरू असताना आता चोरट्यांनी थेट लोखंडी खांबच चोरून नेण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. नवापूर तालुक्यातील मावचीफळी शिवारातून तब्बल पाच वीजखांब चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरीच्या या नव्या प्रकारामुळे आता पोलिसांपुढील डोकेदुखीही वाढली आहे.
पोलिस सूत्रांनुसार, महावितरणने वीज वाहक तारा लावण्यासाठी मावचीफळी, ता. नवापूर शिवारात लोखंडी खांब उभे केले होते. त्यांना आधार म्हणून लोखंडी स्टॅण्ड लावण्यात आले होते. चोरट्यांनी हॉटेल ते मावचीफळी यादरम्यान असलेले पाच खांब आणि तीन लोखंडी स्टॅण्ड काढून नेले. त्यांची किंमत ४३ हजार २०० रुपये इतकी होती. महावितरणचे कर्मचारी जागेवर गेले असता त्यांना खांब व स्टॅण्ड नसल्याचे दिसून आले. शोधाशोध केली असता कुणीतरी ते चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वीज कंपनीचे कर्मचारी प्रदीप प्रताप गावित यांनी फिर्याद दिल्याने नवापूर पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार प्रतापसिंग वसावे करीत आहेत.