गेल्या दोन वर्षांपूर्वी माजी आमदार सुभाष साबणे यांनी कुंडलवाडीला ग्रामीण रुग्णालय मंजूर करून आणले व बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून घेतला. नियोजित ग्रामीण रुग्णालय विश्रामगृहाच्या बाजूला बंद असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या ठिकाणी बांधण्याचे ठरले. त्याप्रमाणे बांधकाम करण्यासाठी निविदा काढण्यात आली. प्रत्यक्ष काम करण्यासाठी ठेकेदारही उपलब्ध झाला; पण सदरील जागेचा सर्व्हे नंबर चुकीचा असल्याने या कामाला सुरुवातच झाली नाही; पण या नियोजित जागेजवळ स्मशानभूमी आहे. रुग्ण उपचारासाठी तिकडे जाणार नाहीत. ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही ही जागा अडचणीची ठरणार असल्याने या जागेचा नाद सोडून द्यावा, योग्य पर्यायी जागा देण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांनी प्रयत्न करावेत, जेणे करून ही जागा उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी व तेथे रुग्णाच्या सेवेत उपचारासाठी चोवीस तास सज्ज राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सोयीची राहील, असे ते म्हणाले. ग्रामीण रुग्णालयासाठी पर्यायी जागा देण्यासाठी नपाने प्रयत्न करावेत.
या पत्रकार परिषदेसाठी सोसायटीचे प्रभारी चेअरमन सयाराम नरावाड, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप अंबेकर, युवक शहर अध्यक्ष सिराज पट्टेदार, संजय पाटील खुळगे, सुभोंड आदींची उपस्थिती होती.