कोणाची काय शैली आम्हाला माहिती नाही; राणेंनी गुन्हा केला, कारवाई होणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 12:40 PM2021-08-24T12:40:23+5:302021-08-24T12:42:58+5:30
Nana Patole on Narayan Rane : राणे राज्याचे वातावरण खराब करत आहेत, ही महाराष्ट्र संस्कृती नाही
नांदेड : कायदा हा माणसासाठी असतो पदासाठी नसतो. त्यामुळे नारायण राणेंनी ( Narayan Rane ) गुन्हा केला आहे, कारवाई तर होणारच. परंतु, अशा प्रकारची वक्तव्य करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी केली.
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत सोमवारी आक्षेर्पाह वक्तव्य केले. याचे पडसाद आता राज्यात उमटत आहेत. यावर सर्वस्तरातून प्रतिक्रिया येत आहे. राणेंच्या वक्तव्याचा शिवसेनेसह कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी निषेध केला आहे. औरंगाबाद, नाशिक, जुहू येथे शिव सैनिकांची आक्रमक आंदोलने सुरु आहेत. नांदेडमध्येकाँग्रेसच्यावतीने आयोजित कार्यक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले होते. यावेळी पटोले यांनी राणेंच्या व्यक्तव्याचा निषेध करत हा गुन्हा असल्याची तीव्र प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा - औरंगाबादमध्ये नारायण राणेंच्या विरोधात शिवसैनिकांचे जोडेमारो आंदोलन
नाना पटोले म्हणाले, कॉंग्रेस पक्ष त्या वाक्याचा निषेध करतो, राणे राज्याचे वातावरण खराब करत आहेत. राज्यातील अनेक जण केंद्रात मंत्री झाले याचा आनंद होता. राज्यातील अनेक विकास कामे त्यामुळे मार्गी लागतील, केंद्राची मोठी मदत होईल असे वाटले होते. परंतु, केंद्रीय मंत्र्यांनी अशा प्रकारची वक्तव्य निषेधार्ह आहेत. ही महाराष्ट्राची संकृती नाही. कोणाची काय शैली आम्हाला माहिती नाही. कायदा पद पाहत नाही, राणेंनी गुन्हा केला त्यांच्यावर कारवाई होईल, असेही पटोले यावेळी म्हणाले.