पार्डी ( जि. नांदेड) : पाण्यात वाहून जाणा-या दोन तरुणींना जीवाची पर्वा न करता वाचविणा-या पार्डी ता. अर्धापूर येथील एजाज अ. रऊफ नदाफ यास भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय शौर्य बालक पुरस्कार-२०१७ जाहीर झाला. यंदा महाराष्ट्रातून हा पुरस्कार एकमेव एजाजला मिळाला. २६ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे होणा-या शानदार कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा पुरस्कार एजाजला दिला जाणार आहे.
बुधवारी (दि. ६) या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. पुरस्काराचे वितरण २६ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असून प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात येणा-या दिल्ली येथील पथसंचलनामध्येही सहभाग घेता येणार आहे. देशात २५ बालकांना हा पुरस्कार मिळणार असून महाराष्ट्रातून एकमेव एजाज नदाफला हा शौर्य पुरस्कार मिळणार आहे. तसे पत्र तहसील कार्यालयास प्राप्त झाले. सदरील पत्राची प्रत पुरस्कारप्राप्त एजाज नदाफ यांस देऊन तहसील प्रशासनाच्या वतीने देऊन तहसीलदार अरविंद नरसीकर यांनी सत्कार केला. यावेळी मंडळ अधिकारीशेख शफिय्योद्दीन, पार्डी म.चे तलाठी माधव पाटील, माजी जि. प.सदस्य रामराव भालेराव, नागोराव भांगे पाटील, सय्यद युनूस पार्डीकर, पालक अ.रउफ नदाफ, अरबाज नदाफ आदी उपस्थित होते.
तरुणींना बुडताना वाचवले होते ३० एप्रिल२०१७ रोजी पार्डीनजीक असलेल्या नदीवरील बंधा-यातील पाण्यात कपडे धुण्यासाठी चार तरुणी गेल्या होत्या. त्यांचा तोल गेल्यामुळे त्या पाण्यात बुडत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या बहिणीस ही बाब लक्षात आल्यानंतर तिने मदतीचा धावा केला. यावेळी नागरिक धावून गेले असता मदत मिळाल्यामुळे दोघींना वाचविण्यात यश आले़ तर दोघींचा मृत्यू झाला. यात एजाज नदाफ या बालकाने जिवाची पर्वा न करता दोघींचे प्राण वाचविले होते. एका विद्यार्थ्याच्या धाडस व समयसुचकतेमुळे दोन युवतीचे प्राण वाचले. त्याच्या या शौर्याची दखल घेऊन तहसीलदार डॉ.अरविंद नरसीकर यांच्या मार्फत भारतीय बालकल्याण परिषद दिल्ली यांना माहिती पाठविण्यात आली होती.