नांदेड- संजय राऊत यांच्यावर अन्याय झाला होता. परंतु आता राऊत यांना जो न्याय मिळाला तोच न्याय नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मिळावा अशी अपेक्षा आहे. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असे प्रतिपादन खा.सुप्रिया सुळे यांनी केले.
भारत जोडो यात्रेसाठी सुप्रिया सुळे या गुरुवारी नांदेडात आल्या होत्या. सत्ता ही कुणावर अन्याय करण्यासाठी नसते. तर माय-बाप जनतेची सेवा करण्यासाठी असते. राऊत यांच्यावर अन्याय झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना किती त्रास झाला. परंतु सत्य जे आहे ते बाहेर येण्याची गरज आहे. देशात महागाई, बेरोजगारी यासारखे मोठे प्रश्न आहेत. परंतु ते सोडून इतर विषय पुढे आणले जात आहेत. नोटबंदी झाली मग एवढ्या नोटा आणल्या कुठून? त्या छापल्या कुठे? त्याचे वितरण कसे केले? असे अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत.
महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था ही मोठी आव्हाने आहेत. त्यावर एक समाज म्हणून चर्चा केली पाहिजे. त्यासाठी राज्याचे अधिवेशन बोलवा. त्यात मोठे चार प्रकल्प राज्याबाहेर कसे गेले यावर चर्चा करा. ते प्रकल्प कोणत्याही राज्यात जावो याला महत्व नाही. परंतु मेरीटवर असलेल्या महाराष्ट्रातून का गेले? राज्यात चांगले शिक्षण, सुरक्षितता आहे. त्यामुळे देशभरातून मुले शिकण्यासाठी येतात. दिवंगत अरुण जेटली नेहमी म्हणायचे केंद्र आणि राज्याचे प्रेमाचे संबंध असले पाहिजे. परंतु दुर्देवाने ते आज होताना दिसत नाही, अशी खंतही सुळे यांनी व्यक्त केली.