कोणत्याही पक्षातील बड्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि तो नेता भाजपमध्ये गेला की शांत बसायचे, हा माजी खा. किरीट साेमय्या यांच्या आडून भाजपचा डाव सुरू आहे. तसेच कोणत्या नेत्यावर ईडीची कारवाई होणार यांचे भाकीत सोमय्या अगोदरच करतात, ते ईडीचे दलाल आहेत की काय, असा सवालही सूरज चव्हाण यांनी उपस्थित केला. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे किरीट सोमय्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर उट-सूट आरोप करीत आहेत. यापूर्वी त्यांनी कृपाशंकर सिंग, नारायण राणे, बबनराव पाचपुते, आदी नेत्यांवर आरोप केले. त्यांच्याकडे पुरावे असल्याचेही दावे त्यांनी केले होते. मग या प्रकरणात कारवाई का नाही, पुन्हा आंदोलन का नाही, असा सवाल उपस्थित करीत यापुढे राष्ट्रवादी किरीट सोमय्या यांना जवाब विचारणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यासंदर्भात एक लाख पत्र किरीट सोमय्या यांना पाठवून त्यांना जवाब विचारणार आहे. ही मोहीम नांदेड येथून सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष दिलीप धोंडगे, नांदेड शहराध्यक्ष रऊफ जमीनदार, जि. प. सदस्य समाधान जाधव, कार्याध्यक्ष सचिन जाधव, बाळासाहेब भोसीकर, कन्हैया कदम, धनंजय सूर्यवंशी, शिवराज धोंडगे, उद्योग आघाडीचे श्रीधर नागापूरकर, आदींची उपस्थिती होती.