नांदेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनकर दहिफळे यांची निवड झाली़ शनिवारी दुपारी १२ वाजता पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे लक्ष्मण ठक्करवाड यांना १० तर दिनकर दहिफळे यांना ११ मते मिळाली़
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेली नावे मागे पडल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसने जि़प़ चे माजी सभापती दिनकर दहिफळे यांचे नाव पुढे केले़ निवडणुकीचा उमेदवारी अर्ज राष्ट्रवादीचे दिनकर दहिफळे व भाजपाचे लक्ष्मण ठक्करवाड यांनी दाखल केले़ एकुण २१ संचालकांमध्ये काँग्रेसचे ५, राष्ट्रवादीचे ८, भाजपाचे ४, शिवसेनेचे ३ व एक अपक्षाचा समावेश आहे़ त्यापैकी दहिफळे यांना ११ तर ठक्करवाड यांना १० मते मिळाली़ दहिफळे यांचा एका मताने विजय झाला़ दरम्यान, या निवडणुकीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस यांची नियुक्ती करण्यात आली होती.
शनिवारी सकाळी ११ ते ११़३० या कालावधीत अर्ज स्विकारण्यात आले़ यावेळी ३ अर्ज संचालकांनी घेतले होते़ त्यापैकी २ अर्ज प्राधिकृत अधिका-यांकडे दाखल करण्यात आले़ ११़४५ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यात येणार होते़ मात्र दोघांनीही अर्ज मागे घेतले नाही़ त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागली़ संचालक मतदारांनी गुप्तपणे मतदान केले़ १२़२० वाजता मतदान प्रक्रिया पार पडली़ मतमोजणीत भाजपाचे ठक्करवाड यांना १० तर दहिफळे यांना ११ मते मिळाली़
भाजपाचाच अध्यक्ष होणार, असल्याचा दावा दिनकर दहिफळे यांच्या निवडीमुळे फोल ठरला़ दहिफळे हे प्रथमच बँकेच्या संचालकपदी आले आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेसचे एकुण १३ सदस्य असले तरी दहिफळे यांना ११ मते मिळाली़ राष्ट्रवादीचे २ मते त्यांना मिळाले नाहीत़ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांचे मत दहिफळे यांना मिळाले नाही. कर्ज वसुलीचे बँकेसमोर अव्हान असले तरी शेतक-यांना बँकेचा आधार मिळावा, यासाठी प्रयत्न करू, असे नुतन अध्यक्ष दिनकर दहिफळे यांनी सांगितले़
राष्ट्रवादीचे सदस्य - दिनकर दहिफळे, डॉ़ सुनील कदम, श्रीनिवास देशमुख गोरठेकर, मोहन टाकळीकर, हरिहरराव भोसीकर, राजेश कुुंटुरकर, जिजाबाई जगदंबे, गयााबाई चव्हाण, काँग्रेस - शंकरराव शिंदे, गोविंदराव शिंदे, केशवराव पाटील, बाळासाहेब कदम, अन्नपुर्णाबाई देशमुख़ भाजपा - भास्करराव पाटील खतगावकर, दिलीप कंदकुर्ते, लक्ष्मण ठक्करवाड, गंगाधर राठोड़ शिवसेना - प्रतापराव पाटील चिखलीकर, नागेश आष्टीकर, प्रविण पाटील चिखलीकरअपक्ष - सुशांत चव्हाण