मोदींविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:40 AM2018-04-20T00:40:57+5:302018-04-20T00:40:57+5:30
उत्तप्रदेशातील पोटनिवडणूक मुलायमसिंग आणि मायावती यांनी युती करुन लढविल्याने भाजपचा पराभव झाला़ यापुढेदेखील भाजप आणि मोदींविरोधात सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येवून निवडणूका लढविणे गरजेचे आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : उत्तप्रदेशातील पोटनिवडणूक मुलायमसिंग आणि मायावती यांनी युती करुन लढविल्याने भाजपचा पराभव झाला़ यापुढेदेखील भाजप आणि मोदींविरोधात सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येवून निवडणूका लढविणे गरजेचे आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले़
नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शहरातील भक्ती लॉन्स येथे आयोजित मराठवाडा विभागीय कार्यकर्ता शिबीरात ते बोलत होते़ मंचावर अ़भाक़ाँग्रेसचे सरचिटणीस तथा महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा.राजीव सातव, खा. कुमार केतकर, विधान परिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, आ. डी.पी. सावंत, आ. अमिता चव्हाण, आ. अमर राजूरकर, आ़हर्षवर्धन सपकाळ, आ़मधुकर चव्हाण, आ. वसंतराव चव्हाण, अमित देशमुख, आ़बस्वराज पाटील, आ़हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री नईम खान, आ. अब्दुल सत्तार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजप सत्तेत येवून चार वर्ष लोटली तरी अद्याप त्यांनी कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही़ वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने आजपर्यंत किती जणांना रोजगार उपबल्ध करून दिला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़
बुलेट ट्रेन, नोटाबंदी आणि जीएसटीवरून चव्हाण यांनी भाजप सरकारवर सडकून टिका केली़ बहुतांश प्रकल्प गुजरामध्ये घेवून जाणारे मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की गुजारातचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला़ काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या नेतृत्वात नवीन तरूण काँग्रेसचा जन्म झाला असून ही परिवर्तनाची सुरूवात असल्याचे ते म्हणाले़ अ. भा. काँग्रेसचे सचिव खा़राजीव सातव म्हणाले, मंत्रालयात आत्महत्या झाल्याची देशातील पहिली घटना आहे़ सर्कशीप्रमाणे मंत्रालयाला जाळ्या बसविल्या असून त्या मंत्रालयातील जोकरासाठी बसविल्याची टिका त्यांनी केली़ मंत्रालयात एवढे बोके असताना उंदिर मारण्यासाठी लाखो रूपये कशाला खर्च करावे लागतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ ते म्हणाले, काँग्रेसचा अजेंडा राष्ट्रनिर्माणाचा असून त्यादृष्टीनेच कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन केले़
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे म्हणाले, नांदेड ही काँग्रेसची यशोभूमी आहे़ येथील लोकांनी दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांच्याप्रमाणेच अशोकराव चव्हाण यांनाही भरभरून साथ दिली़ काँग्रेस हा सर्व जाती-धर्मांचा आदर करणारा, त्यांना सोबत घेवून चालणारा पक्ष आहे़ काँग्रेसने विष्णुपुरी, जायकवाडी, इसापूर असे शेकडो धरणं बांधून देश सुजलाम् सुफलाम् करण्याचे कार्य केले़
दरम्यान, माजी मंत्री नसीम खान, माणिकराव ठाकरे आदींनी आपले विचार मांडले़ प्रास्ताविकात काँग्रेस महानगराध्यक्ष आ़अमरनाथ राजूरकर यांनी शिबीर आयोजनामागील भूमिका विशद केली़ कार्यक्रमास महापौर शीला भवरे, सभापजी शीला निखाते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बी़ आऱ कदम, निलेश पावडे, विजय येवनकर, शाम दरक, प्रवक्ते संतोष पांडागळे आदी उपस्थित होते़ सूत्रसंचालन प्रा़संतोष देवराये तर जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर यांनी आभार मानले़
चव्हाण : काँग्रेसच देवू शकते अच्छे दिन
़अशोकराव चव्हाण म्हणाले, सत्ते येण्यापूर्वी भाजपने जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखविले़ परंतु, ते पूर्ण करण्याची ताकद केवळ काँग्रेसमध्येच आहे हे आता जनतेच्या लक्षात आले आहे़ भाजपने पहिल्या कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षण, शेतीमालाला उत्पन्नावर आधारीत हमी भाव आदी निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दिले होते़ परंतु, एकही आश्वासन भाजपाने पूर्ण केले नाही़ सर्व घटकांच्या हातावर तुरी देण्याचे काम या सरकारने केल्याची टिका त्यांनी केली़ राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित जमिनीचा मावेजा देण्याबाबत सरकारची भूमिका न्यायीक नाही़ शहर आणि ग्रामीण भागात वेगवेगळा मावेजा दिला जात आहे़ तर ग्रामीण भागात वेगवेगळे टप्पे करून दिला जाणार आहे़ यास शेतकºयांचा विरोध असल्याचे ते म्हणाले़ यासंदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले़ तसेच आपण स्वत: गडकरी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे खा़अशोकराव चव्हाण यांनी सांगितले़