-प्रदीपकुमार कांबळे
लोहा (नांदेड ) : महाराष्ट्रातील लोकनाट्य कलावंतांची उतारवयातील परवड थांबविण्यासाठी शासनाने त्यांच्यासाठी स्वतंत्र वृद्धाश्रमांची स्थापना करावी, अशी अपेक्षा प्रसिद्ध लोकनाट्य कलावंत मंदाराणी खेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली़
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत रघुवीर खेडकर यांचे लोकनाट्य दाखल झाले आहे़ सलग तीस वर्षांपासून श्री खंडेरायाच्या यात्रेत ते रसिकांची सेवा करतात़ यंदाही ६० कलावंतांच्या संचासह रसिकांचे मनोरंजन ते करत आहेत़ लोकनाट्य मंचावर आपल्या नृत्य व अदाकारीने रसिकांना भुरळ घालणार्या रघुवीर खेडकर यांच्यासोबत त्यांच्या भगिनी मंदाराणी खेडकर यांच्या कलेलाही रसिक तेवढीच दाद देतात़ आजही हे भाऊ - बहीण लोककलेची आराधना मोठ्या श्रद्धेने करतात़ हा प्रवास व्यक्त करताना मंदाराणी खेडकर म्हणाल्या, पूर्वी लोकनाट्य मंडळाला खूप चांगले दिवस होते़ मात्र गेली दोन दशकांपासून लोकनाट्य मंडळ अनेक अडचणींचा सामना करीत प्रवास करीत आहेत़ चेहर्यावर रंग चढवून रसिकांच्या मनोरंजनासाठी उसने अवसान आणून हे कलावंत आपले दु:ख विसरून जातात़ पोटाची खळगी भरण्यासाठी या गावाहून त्या गावात भटकतात़ अशावेळी आपले कुटुंब त्यांना विसरावे लागते़.
आज लोकनाट्य रसिकांची अभिरूची बदलली आहे़ त्यांच्या मागणीनुसार आम्हाला कला सादर करावी लागते़ अनेकदा वाईट प्रसंग ओढवतात़ त्याकडे दुर्लक्ष करून आमचे कलावंत कला सादर करतात़ आजच्या युगातही तमाशाचा कलावंत कायम आहे, याचे समाधान आम्हाला वाटते़. महाराष्ट्रात बोटावर मोजण्याएवढे लोकनाट्य मंडळ जिवंत आहेत़ त्यातील बहुतांशी लोकनाट्य मंडळे हे कर्जबाजारी आहेत़ अलीकडे नोटाबंदी व जीएसटीमुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे़ शंभर, सव्वाशे माणसांचा हा प्रपंच चालविणे अवघड झाले आहे़ शासनाचे पॅकेज मिळत असले तरी ते तुटपुंजे आहे़ या पॅकेजमुळे कोणतेही काम होत नाही़ शासनाने या पॅकेजमध्ये वाढ करावी, अशी आमची मागणी आहे़ पश्चिम महाराष्ट्रात आजही लोकनाट्यात गण-गवळण व वगाला महत्त्व दिले जाते़ अस्सल व पारंपरिक लावणीची मागणी त्या ठिकाणी होते़ खानदेशमध्येही लोकनाट्यावर प्रेम करणारी मंडळी आहे़ मराठवाड्यातील रसिकांची मात्र अभिरूची बदलली आहे़ याठिकाणी आम्हाला हिंदी चित्रपटातील गाणे सादर करावे लागतात़ असे असले तरी आम्ही वगनाट्य सादर करतोच़ वगनाट्याद्वारे समाजप्रबोधनाची अपेक्षा आम्ही करतो़
लोकनाट्य कलावंतास तारूण्यात असताना रसिक डोक्यावर घेतात़़ एकेकाळी आपल्या कलेने सर्वांना घायाळ करणार्या अनेक नृत्यांगणावर उतारवयात आज भांडे घासण्याची, हॉटेलमध्ये काम करण्याची वेळ आली आहे़ त्यांना कोणी सांभाळत नाही़ अशावेळी या कलावंतांसाठी स्वतंत्र वृद्धाश्रमाचंी गरज आहे़ -मंदाराणी खेडकर