नांदेड : भारत जेव्हा इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला. त्यावेळेस या देशात प्रचंड दारिद्र्य होते. भूकबळीच्या घटना घडत होत्या. देशामध्ये साधी सुईसुध्दा बनविली जात नव्हती. अशा कठीण परिस्थितीतून देशाला बाहेर काढून आधुनिकतेकडे नेण्याचा पं.जवाहरलाल नेहरु यांनी प्रयत्न केला. आज जो काही प्रगत भारत दिसतो त्याची पायाभरणी नेहरु यांनी केली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व नागपूर लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी केले.
डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते. येथील यशवंत महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डी.पी.सावंत हे होते. तर यावेळी व्यासपीठावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.उध्दव भोसले, शारदा भवन शिक्षण संस्थेचे सहसचिव अॅड.उदय निंबाळकर, कोषाध्यक्ष प्राचार्य रावसाहेब शेंदारकर यांची उपस्थिती होती़
द्वादशीवार म्हणाले, पं.जवाहरलाल नेहरु आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात मोठे मतभेद असल्याचा अपप्रचार मागील अनेक वर्षांपासून केला जातो. परंतु वास्तवात त्यांच्यात काही मतभिन्नता जरी असली तरी, त्यांचे अनेक विषयांवर मतैक्य होते. देशाच्या जडणघडणीत दोघांनीही महत्त्वपूर्ण भूमिका वठविली. केवळ वय अधिक व आजारपण पाठीमागे असल्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत. यामध्ये पं.जवाहरलाल नेहरु यांचा कोणताही दोष नव्हता. पं.नेहरु यांच्याविषयी काही जण अज्ञानातून तर बरेचजण जाणूनबुजून अफवा पसरविण्याचे व त्यांच्याविषयी लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम करीत आहेत. ज्याअर्थी तब्बल ५५ वर्षानंतर सुध्दा त्यांच्या नावाचा उल्लेख या देशात वारंवार केला जातो, त्याअर्थी त्यांचे काम निश्चितच मोठे होते.
हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या पोलीस अॅक्शनसंदर्भात दोन्ही नेत्यांची एकवाक्यता होती. खरे तर मौलाना अबुल कलाम यांच्यावर हा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी काँग्रेसने दिली होती. परंतु, त्यांनी विनम्र नकार दिल्यामुळे वल्लभभाई पटेल यांनी ही जबाबदारी यशस्वी पार पाडून निजामाच्या जोखडातून हैदराबाद राज्य मुक्त केले. यासाठी पं.नेहरु यांनी त्यांना पूर्ण मोकळीक दिली होती.महाराष्ट्राच्या जडणघडणीत डॉ.शंकरराव चव्हाण यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यासारखी हिमालयाएवढी कर्तृृत्ववान माणसे या परिसरात जन्मली याचा आपणास अभिमान वाटला पाहिजे. एका संन्यस्त व्यक्तीच्या नेतृत्वाखाली हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा दिल्या गेला. त्यामध्ये डॉ.शंकरराव चव्हाण यांच्यासारखे त्यागी व्यक्ती असल्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
पंडित नेहरु होते म्हणूनच जम्मू-काश्मीर भारतातकाश्मीर प्रश्नाबाबत द्वादशीवार म्हणाले, काश्मीरचा प्रश्न हा मुळामध्ये राजा हरिसिंग यांच्यामुळे निर्माण झाला़ कपट, कारस्थान करुन राजा हरिसिंगांनी काश्मीरचे राज्य मिळविले होते. हा राजा पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांना खेळवत ठेवत होता. जेव्हा पाकिस्तानी टोळ्यांनी श्रीनगरपर्यंत मजल मारली. तेव्हा राजा हरिसिंगांनी भारताकडे मदत मागितली. आधी विलिनीकरण व त्यानंतरच मदत ही भूमिका नेहरुंनी घेतली़ केवळ पं. नेहरु होते म्हणूनच जम्मू-काश्मीर आज भारतामध्ये आहे. काश्मीरचा प्रश्न हा राजकीय किंवा धार्मिक नसून तो लष्करी प्रश्न आहे. जी लढाई १४ महिने चालली ती केवळ एक किंवा दोन आठवडे पुढे रेटली असली तरी, आपल्याला पाकव्याप्त काश्मीर जिंकता आला नसता, असेही ते म्हणाले.
गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न डी.पी.सावंत म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पं.जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या नेत्यांना पक्षाच्या चौकटीत बांधणे चुकीचे आहे. नेहरुंविषयी गैरसमज निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. पं.नेहरु यांच्याच परवानगीने मराठवाड्यातील पैठण येथील महाकाय जायकवाडी धरण डॉ.शंकरराव चव्हाण यांनी बांधले.