नांदेड: शहरातील देगाव चाळ भागात २ मार्चच्या पहाटे ४ वाजता पाणी भरण्याच्या वेळेत दिगंबर वामनराव राजभोज कुटुंब आणि शेजारी राहणारे कुटुंब यांच्यात कचरा घरासमोर का टाकला म्हणून भांडण झाले.त्यात दोघा भावावर चाकूने हल्ला करण्यात आला. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
शेजारी राहत असलेल्या दोन्ही कुटुंबात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्यात बुधवारी पहाटे कचरा टाकण्यावरून हा वाद विकोपाला गेला. काही जणांनी प्रफुल्ल दिगंबर राजभोज (३५) आणि संतोष दिगंबर राजभोज (३३) यांना पोटात,बरगडीत चाकूचे वार करून त्यांचा खून केला. तर अन्य दोघांना जखमी केले.
वजिराबाद पोलिसांनी या संदर्भाने मधुकर निवृत्ती राजभोज आणि अमोल गोविंदराव वाढव या दोन जणांना ताब्यात घेतले आहे.या भांडणात संदीप दिगंबर राजभोज (२७) आणि राहुल संजय धोंगडे (१८) असे दोन जण जखमी आहेत.या दुहेरी खुन प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवराज जमदडे यांच्याकडे देण्यात आला आहे.