लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात १०० प्रवेश क्षमतेच्या मुलींच्या नवीन वसतिगृह इमारत बांधकामाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने बुधवारी या संदर्भातील शासन निर्णय जारी केला. या वसतिगृहाच्या उभारणीसाठी अशोकराव चव्हाण प्रयत्नशील होते व काही दिवसांपूर्वीच त्यांची या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले असून, या निर्णयाचा नांदेड जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांमधून येणाऱ्या विद्यार्थिनींनी लाभ होणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर या चार जिल्ह्यांसह बाहेरील राज्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी येतात. यामध्ये मुलींची संख्याही मोठी आहे. यामुळे विद्यापीठातच मुलींची राहण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी १०० प्रवेश क्षमता असलेले मुलींचे नवीन वसतिगृह उभारण्यात यावे, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जोरदार प्रयत्न चालवले होते. उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांनी नांदेड येथील विद्यापीठाच्या परिसरामध्ये १०० प्रवेश क्षमता असलेले मुलींचे नवीन वसतिगृह बांधकामासाठी सन २०१९-२०च्या सुधारित दरसुचीनुसार ८२१.१२ लक्ष इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत प्रस्ताव शासनाला सादर केला होता. या बांधकामाच्या अंदाजपत्रकाला मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद यांनी तांत्रिक सहमती दिली होती. या संपूर्ण प्रशासकीय कार्यवाहीनंतर बुधवारी याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला.