कंधार (नांदेड ) : शहरी विद्युत वितरण प्रणाली सशक्त करण्यासाठी केंद्र शासनाने इंटीग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्किम (आय.पी.डी.एस.) कार्यान्वित केली आहे. त्या अंतर्गत कंधार शहरात ३३/११ केव्ही नवीन उपकेंद्र आकाराला येत असून त्यासाठी १ कोटी ४४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे शहरातील विजेची समस्या सुटणार आहे.
तालुक्यात सुमारे २३ हजार ९६२ घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहक आहेत़ कंधार शहर, कुरुळा, बारूळ, पेठवडज, कंधार ग्रामीण युनिट अंतर्गत ९० गावे आणि ५० पेक्षा अधिक वाडी-तांड्यांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागतो़ ग्रामीण भागात वीजपुरवठ्यासाठी फुलवळ, बाचोटी, बारूळ, पेठवडज, कुरुळा येथे सबस्टेशन आहेत़, परंतु बहुतांश वेळा तो शहर सबस्टेशन येथून करण्याचा प्रसंग येतो़ त्यामुळे शहर व ग्रामीण भागावर मोठा ताण पडत होता़ त्यात आता केंद्र सरकारच्या नवीन योजनेमुळे वीज वितरण प्रणाली सशक्त होणार आहे.
३३/११ केव्ही नवीन उपकेंद्राची स्थापना केली जात आहे़ योजनेअंतर्गत विविध मुख्य कार्य मोठ्या प्रमाणात आहेत़ नवीन उपकेंद्र निर्मिती, पावर ट्रान्सफॉर्मरची स्थापना, ३३/११ के़व्ही़ किंवा एल़टी़ लाईनची स्थापना, भूमीगत केबलिंग, नवीन वितरण ट्रॉन्सफॉर्मरची स्थापना, फिडर आदी ग्राहकांच्या मागणीप्र्रमाणे सोय आदी कामांचा समावेश आहे़ शहरातील २४ हजार ८४३ लोकसंख्येला याचा फायदा होणार आहे.
योजनेअंतर्गत शहरात उपकेंद्र निर्मितीचे काम सुरू झाले आहे़ दीड वर्षांत हे काम पूर्ण करण्यात येणार असून १५ डिसेंबर २०१८ ही अंतिम मुदत आहे़ सदर काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामीणचा भार कमी होवून शहराचा विद्युत पुरवठा सुरळीत होणार आहे. या चालू असलेल्या कामावर नांदेड पायाभूत आराखडा विभागांतर्गत नियंत्रण असल्याचे उपकार्यकारी अभियंता विकास खाचणे यांनी सांगितले़
आयपीडीसी अंतर्गत दीड कोटी रुपयांचा निधीयोजनेला २०१६ साली मंजुरीनंतर २०१७ पासून काम सुरु झाले़ नवीन ट्रान्सफॉर्मर फिडर आदींची सोय होणार असल्याने शहराची विद्युत क्षमता वाढण्यास मोठी मदत मिळणार आहे़ ग्राहकांना सुलभ सेवा पुरविता येईल.- एस.ए. दासकर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण़