- रामेश्वर काकडे नांदेड: गतवर्षी नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील ३० कारखान्यांनी एक कोटी पाच लाख ६५ हजार ७७८ टन उसाचे गाळप केले होते तर एक कोटी सहा लाख ७९ हजार ६४१ क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. परंतु, यावर्षी नांदेड विभागात उसाचे नवीन लागवड क्षेत्र ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने यंदा साखरेच्या उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट होईल, असा अंदाज ऊस तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
नांदेड विभागात नांदेड ६, लातुर १२, परभणी ७ तर हिंगोली जिल्ह्यात ५ असे एकूण ३० सहकारी साखर कारखाने आहेत. गतवर्षी ३० कारखान्यांनी १ कोटी ५ लाख ६५ हजार ७७८ मे. टन ऊसाचे गाळप केले होते. तर १ कोटी ६ लाख ७९ हजार ६४१ मे टन साखरेचे उत्पादन झाले होते. विभागाचा सरासरी साखर उतारा १०.११ टक्के इतका आला होता. यावर्षी नवीन ऊस लागवड मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने साखर उत्पादनात कमालाची घट येण्याची शक्यता आहे. गतवर्षी ऊस गाळपासाठी ३१ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते, पण त्यापैकी ३० कारखान्यांनी प्रत्यक्षात ऊसाचे गाळप केले.
विभागातील जिल्हानिहाय ऊस लागवड या हंगामात नांदेड विभागात ऊसासाठी सरासरी असलेले क्षेत्र आणि प्रत्यक्ष झालेली ऊस लागवड अशी- नांदेड सरासरी क्षेत्र २२ हजार ३०३ हेक्टर, प्रत्यक्ष ऊस लागवड २३६२ हेक्टर, ११ टक्के, परभणी २५ हजार ९२ हेक्टर, प्रत्यक्ष लागवड ११ हजार ४३४ हेक्टर, ४६ टक्के, हिंगोली सरासरी क्षेत्र १० हजार ६३६ हेक्टर, लागवड ७ हजार ३१९ हेक्टर, ६९ टक्के, लातुर ३६ हजार ५८४ हेक्टर, प्रत्यक्ष लागवड ७०८ हेक्टर, दोन टक्के याप्रमाणे नांदेड प्रादेशिक सहसंचालक कार्यालयांतर्गत उसाची नवीन लागवड करण्यात आलेली आहे.
दिवसेंदिवस पाण्याची भासते कमतरताउसाला मिळणारा भाव खर्चाच्या तुलनेत कमी मिळत आहे. त्यात उसाला जास्त पाण्याची आवश्यकता असते. पण, दिवसेंदिवस पाण्याची कमतरता भासत असल्याने अनेक शेतक-यांनी ऊस लागवडीकडे पाठ फरविल्याचे दिसून येते. त्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली व लातुर या चारही जिल्ह्यात ऊस लागवडीचे क्षेत्र घटले आहे.
२१-२२ मध्ये १ कोटी ४७ लाख टन ऊस गाळप नांदेड विभागात २०२१- २२ या वर्षात नांदेड, परभरणी, लातुर व हिंगोली या चार जिल्ह्यात २७ साखर कारखान्यांनी १ कोटी ४७ लाख ८३४७ मे. टन ऊसाचे गाळप केले होते. तर १ कोटी ५३ लाख २१६५३ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते.