राज्यात मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुनरुच्चार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 05:11 PM2021-08-25T17:11:50+5:302021-08-25T17:17:53+5:30
जिथे जातीयवाद झाला त्याचा परिणाम त्या देशास भाेगावा लागला आहे.
नांदेड : भाजपकडून जातीयवादी राजकारण केले जात आहे. त्यामुळे सर्व समाजाने भाजपचे स्वार्थी राजकारण हाणून पाडावे. काँग्रेसची ( Congress ) विचारसरणी सर्व समाजाला न्याय देणारी आहे. त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार असल्याचा पुनरुच्चार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole) यांनी केला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काँग्रेसच्या वतीने ‘व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाओ संविधान’ या कार्यक्रमानिमित्त कुसुम सभागृहात मंगळवारी स्वातंत्र्यसैनिकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील, पालकमंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, विजय वड्डेट्टीवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख, माजी मंत्री डी. पी. सावंत, सचिव संपक कुमार, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, शिवाजीराव मोघे आदींची उपस्थिती होती.
पटोले म्हणाले, ज्यांचा देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीत कोणताच सहभाग नव्हता. त्यांनी धर्माच्या नावावर देश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र जिथे जातीयवाद झाला त्याचा परिणाम त्या देशास भाेगावा लागला आहे. देशाचे स्वातंत्र्य काँग्रेसच वाचवू शकतो. सर्वांनी एकत्र येत भाजपचे स्वार्थी राजकारण हाणून पाडावे, असेही ते म्हणाले.
राज्यात काँग्रेसचा झेंडा फडकवू -अमित देशमुख
नाना पटोले यांची या कार्यक्रमाची संकल्पना असून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सर्वांना एकत्र आणले आहे. काँग्रेसच्या कार्यक्रमातून कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊन नांदेडहून घेतलेली प्रेरणा, ऊर्जा आणि शक्तीच्या बळावर राज्यात काँग्रेसचा झेंडा फडकवू आणि राज्यात कॉंग्रेसचाच मुख्यमंत्री करु, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख ( Amit Deshmukh ) यांनी केले.