नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक प्रक्रिया नांदेड उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पूर्ण केली जात आहे. निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण काम पाहत आहेत.
२६ फेब्रुवारीपासून या निवडणुकीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जात आहेत. २६ फेब्रुवारी रोजी एकही अर्ज आला नाही. त्यानंतर शनिवार, रविवार तसेच सोमवारी स्थानिक सुटी असल्याने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ५ मार्च ही उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता प्रारंभ होईल, अशी शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरताना राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये, तर इतर मतदार संघातील उमेदवारांना २ हजार रुपये अनामत रक्कम भरणा करावी लागणार आहे. निवडणूक प्रक्रियेत ८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छानणी होईल, तर ९ मार्च ते २३ मार्च या कालावधीत उमेदवारी मागे घेता येईल. २४ मार्च रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. २ एप्रिल रोजी मतदान, तर ४ एप्रिल रोजी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी सांगितले.
चौकट................
मोर्चेबांधणी सुरू..............
जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी जिल्हाभरात मोर्चेबांधणी सुरू आहे. जिल्हा बँकेवर यापूर्वी भाजप, राष्ट्रवादी, सेना यांची सत्ता होती. सर्वाधिक जागा असूनही काँग्रेसला सत्तेतून बाहेर ठेवण्यात आले होते. आता मात्र राज्यातील सत्तापरिवर्तनानंतर हे चित्र बदलले आहे. महाआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व सेना हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवतील काय? ही बाब आता पाहणे महत्त्वाची ठरणार आहे.