नांदेड : समाजाने दुर्लक्षित केलेल्या तृतीयपंथीयांना मृत्यूनंतरही हेळसांड सहन करावी लागत आहे़ शहरात स्वतंत्र स्मशानभूमीसाठी जागा देण्यात यावी, या मागणीसाठी पाच वर्षांपासून तृतीयपंथीयांचा लढा सुरू असला तरी महापालिका प्रशासनाने हा विषय थंडबस्त्यात ठेवला आहे़
शहरासह जिल्ह्यात तृतीयपंथीयांची एक हजाराहून अधिक संख्या आहेत़ शहरात विमानतळ परिसर सांगवी, हिंगोलीगेट, लालवाडी, महेबूबनगर, श्रावस्तीनगर आदी भागांत तृतीयपंथीय राहतात़ रेल्वे, बसस्थानक, आठवडी बाजार अशा ठिकाणी पैसे मागून उदरनिर्वाह करणाऱ्या तृतीयपंथीयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते़ एखाद्या तृतीयपंथीयांचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीच नाही़ एखाद्या स्माशनभूमीत अंत्यसंस्कारासाठी गेले तर त्याठिकाणी त्यांचा दफनविधी करू दिला जात नाही़ काही ठिकाणी तुमची जात कोणती, धर्म कोणता असाही प्रश्न त्यांना विचारला जातो़ मग अशावेळी प्रेत घेवून इतरत्र भटकावे लागते़ ज्याठिकाणी कोणी येणार नाही, अशी एखादी जागा हेरून प्रेत त्या ठिकाणी पुरले जाते़
पुढच्या वेळेस इथे जन्म घेऊ नकोएखाद्या तृतीयपंथीयाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर रात्रीच्या वेळेस दफनविधी केला जातो़ तू पुढच्या जन्मी तृतीयपंथीय म्हणून जन्माला येऊ नको, म्हणून प्रेताला शिव्या दिल्या जातात़ रडत, ओरडत त्याची प्रेतयात्रा काढली जाते़ तृतीयपंथीय समाज म्हणून भारत सरकारने मान्यता दिली असली तरी मानवतेच्या दृष्टीने तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्मशानभूमीसाठी जागा देऊन महापालिकेने न्याय दिला पाहिजे़, अशी मागणी गौरी बकश यांनी केली.
विषय मार्गी लावू शहरातील लालवाडी परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ महापालिकेची जागा आहे़ ही जागा तृतीयपंथीयांना स्मशानभूमीसाठी देता येईल़ त्यासाठी आम्ही जागेची पाहणी सुद्धा केली असल्याचे मनपा उपायुक्त अजितपालसिंह संधू यांनी सांगितले़
लढा सुरू तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी कमल फाऊंडेशनच्या वतीने लढा सुरू आहे़ येणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा विषय पत्रिकेत ठेवण्यात यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- अमरदीप गोधने, अध्यक्ष, कमल फाऊंडेशन