उर्ध्व पैनगंगा प्रकल्प, पूर्णा प्रकल्प, मानार प्रकल्प, शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे शनिवारी सायंकाळी झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आ. बालाजी कल्याणकर, आ. रावसाहेब अंतापुरकर, आ. राजेश पवार, आ. मोहन हंबर्डे, आ. श्यामसुंदर शिंदे, गंगाखेडचे आ. रत्नाकर गुट्टे, आ. राजूभैय्या नवघरे, राष्ट्रीय साखर संघ नवी दिल्लीचे अध्यक्ष जयप्रकाश दंडेगावकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, अधीक्षक अभियंता उप्पलवार, भाऊराव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके, मारोतराव कवळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाण्याची शंभर टक्के उपलब्धता असते तेव्हा कॅनाॅलची दुरुस्ती, कॅनाॅलमधील गाळ या साऱ्या बाबी अपेक्षित जरी असल्या तरी धरणातील पाणी नियोजन केलेल्या कॅनाॅललद्वारे शेवटच्या बांधापर्यंत पोहोचले पाहिजे. या पाण्याचा होणारा अपव्यय जर टाळायचा असेल तर या सर्व कामात काटेकोरपणा आला पाहिजे. डागडुजीविना कॅनाॅल जर योग्य स्थितीत नसतील अथवा त्यात झाडी झुडपी वाढून कॅनाॅल खराब झाले असतील तर वेळेच्या आत पाणी वाटपाच्या पाळ्या लक्षात घेऊन पूर्वीपासूनच याची डागडुजी प्राधान्याने हाती घ्यायला हवीए असे पालकमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट करून विविध प्रकल्पातील पाण्याचे रोटेशन हे नियोजन केल्याप्रमाणे पोहोचलेच पाहिजे, असे निर्देश जलसंपदा विभागाला दिले. या बैठकीत आमदारांनी कालव्याद्वारे पाणी वाटप होतांना येणाऱ्या अनेक अडचणी निदर्शनास आणून दिल्या.