लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी चोरीचे पाईप वापरण्यात येत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता महापालिका प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करेल याकडे लक्ष लागले आहे़ या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही, असे आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.महापालिकेच्या प्रभाग १४ होळी येथे दलित वस्तीतून होणाºया कामासाठी चोरीचे पाईप वापरले जात असल्याचा सुगावा पोलिसांना लागला़ पोलिसांनी एका व्यक्तीस ५ मार्च रोजी ताब्यात घेतले़ त्याने प्रारंभी माहिती देण्यास टाळाटाळ केली, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच अन्य एका व्यक्तीचे नाव सांगितले़ विशेष बाब म्हणजे तो व्यक्ती अद्याप इतवारा पोलिसांनाही सापडला नाही़पोलीस तपासात या प्रकरणाची पाळेमुळे खोलवर रूजली असल्याची बाब उघड होताच महापालिकेने सोहेल कन्स्ट्रक्शनला पाईपचे बिल सादर करण्याबाबत नोटीस बजावली़ तर दुसरीकडे तेलंगणातील एल अॅन्ड टी, मेघा आणि विश्वा या पाईप निर्मिती करणाºया कंपन्यांच्या प्रतिनिधींनी जुन्या नांदेडात सुरू असलेल्या अनेक कामांवर पाहणी करीत सदर पाईप आपल्या कंपनीचे असल्याचे सांगितले़ ते पाईप चोरून आणल्याचे स्पष्ट झाल्यानंतर इतवारा पोलिसांनी जवळपास २०० पाईप जप्त केले आहेत़या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता मोठे रॅकेट या पाईप चोरी प्रकरणातून पुढे येणार आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर महापालिकेनेही आपली बाजू सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ठेकेदार सोहेल कन्स्ट्रक्शनला नोटीस बजावली असली तरी दोन दिवसानंतरही ठेकेदाराकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्याचवेळी सबकॉन्ट्रॅक्टरची प्रक्रियाही सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आयुक्त गणेश देशमुख या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झाला नसला तरी घटनास्थळ तेलंगणात असल्याने तेथे गुन्हा दाखल होईल. त्यानंतरच तेलंगणा व नांदेड पोलिसांकडून या प्रकरणाचा खरा तपास सुरू केल्यानंतरच पाईप चोरी प्रकरणात कोणाकोणाचा समावेश आहे, हे उघड होणार आहे.नायगावातही पाईप ?नांदेड महापालिकेच्या पाणी पुरवठा कामासाठी चोरीचे पाईप वापरले जात असल्याची बाब पुढे आली. पोलीस तपासात नायगाव येथेही काही ठिकाणी तेलंगणातील कंपन्याचे पाईप असल्याची माहिती पुढे आली आहे. या माहितीचीही पोलीस शहानिशा करीत आहेत.
पाईप चोरी प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही- आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:25 AM