महाराष्ट्र दिनापासून १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांनाही लस देण्याचा निर्णय घेतल्यानंतर तरुणाई लसीकरणासाठी सरसावली होती. जिल्ह्यात आतापर्यंत २१ हजार ५६८ जणांना लस दिली आहे. आता लसीकरणासाठी नोंदणी करताना अनेक अडथळे येत आहेत. कोविन ॲपवरून नोंदणी करताना लस घेण्याचा दिनांक व केंद्राची निवड करायची आहे. मात्र, सध्या लसीचा तुटवडा असल्याने मर्यादितच नोंदणी होत आहे. नोंदणी होत नसल्याने अनेक तरुण लसीच्या प्रतीक्षेत आहेत तसेच इतरांच्या मदतीने नोंदणी करण्याचे प्रयत्न करणारे ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रतिक्रिया
कोरोनाची दुसरी लाट जीवघेणी ठरत आहे. अनेक कुटुंबांना कोरोना आजाराने आपल्या कवेत घेतले आहे. त्यामुळे लस घेणे आवश्यक आहे. यासाठी गेल्या आठ दिवसांपासून कोविन ॲपवर नोंदणीचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, काही वेळांतच नोंदणीचा कोटा संपत असल्याने प्रतीक्षा करावी लागत आहे. स्वत:सह कुटुंबातील सदस्यांचेही लसीकरण करण्यासाठी नोंदणी करायची आहे.
सिद्धोधन कापसीकर, वसरणी.
महाराष्ट्र दिनापासून १८ वर्षांवरील तरुणांनाही लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तो आवश्यकच होता. आम्हालाही लस घ्यायची आहे. लस घेण्यासाठी केंद्राची निवड, दिवस याबाबी नोंदवणे आवश्यक आहे. मात्र, कोविन ॲपवरील नोंदणी त्वरित पूर्ण होत आहे. त्यामुळे प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही.
शशिकांत बिचेवार, वाडी.
कोरोना रोखण्यासाठी लसच प्रभावी आहे. ही बाब आता सिद्ध झाली आहे. त्यामुळे लसीसाठी आम्ही उत्सुक आहोत. गेल्या तीन दिवसांपासून लस घेण्यासाठी कोविन ॲपवर नोंदणीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या प्रयत्नांना आतापर्यंत तरी यश मिळाले नाही. कोविड ॲपवरील नोंदणी त्वरित बंद होत असल्याने वारंवार प्रयत्न करावे लागत आहेत.
सचिन महाजन, नांदेड
जिल्ह्यात लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटांतील १९ लाखांवरून अधिक लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. लसीची कमतरता आहेच. जसजशी प्राप्त होत जाईल त्याप्रमाणे १८ ते ४४ वर्ष वयोगटांतील नागरिकांना लस लवकर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी लसींची मागणीही वेळोवेळी नोंदविण्यात येत आहे.
डाॅ. बालाजी शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड.