हदगाव (जि. नांदेड) : येथील पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड गत एक आठवड्यापासून अज्ञातवासात आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांसह सर्व अधिकारी परेशान झाले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत दसरा बंदोबस्तासाठी विजय डोंगरे नावाचे पोलीस निरीक्षक हदगावला पाठविण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दसरा बंदोबस्तासंदर्भात मोबाईल लावला होता, मात्र त्यांनी तो रिसिव्ह केला नाही, किंवा परत शेवाळे यांना लावलाही नाही. नर्सिंग कॉलेजचे रॅगिंग प्रकरणाचा तपास, भानेगाव येथील पोस्कोचा आरोपी पसार झाला होता, तसेच कर्मचाऱ्यांशी असलेले वाद गायकवाड यांना भोवणार असल्याची चर्चा आहे. ते सध्या आजारी असल्याने कोणाचेही फोन घेत नाहीत, असे सांगितले जाते. मात्र गुन्ह्यातील आरोपी फरार झाल्याने वरिष्ठांनी झापल्याने त्यांनी काही वेगळा निर्णय तर घेतला नाही ना? याचीही भीती पोलीस अधिकाऱ्यांना वाटत आहे.
आठ महिन्यांपूर्वी रुजूपोलीस निरीक्षक गायकवाड आठ महिन्याअगोदर हदगाव येथे रुजू झाले होते. त्यावेळी त्यांनी एका जयंतीच्या मिरवणुकीत वर्दीवरच धमाल नाच केल्याने एका समुदायाने हे प्रकरण उचलून धरुन थेट पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली होती. त्यानंतर गायकवाड यांची कंट्रोल रुमला बदलीही करण्यात आली. राजकीय वजन वापरुन त्यांनी पुन्हा हदगाव पोलीस ठाणे मिळविले. मात्र, मागील आठवड्यात भानेगाव येथील एका पोस्कोचा गुन्हेगार ठाण्यातून पळाला होता. तीन दिवसानंतर तो पोलिसांच्या हाती लागला. मात्र, हेच प्रकरण गायकवाड यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.विजय डोंगरे यांच्याकडे पोलीस निरीक्षक पदाचा पदभार देण्यात आला, मात्र त्यांची पोलीस उपअधीक्षक म्हणून बढती झाल्याने काही दिवसच ते हदगावला राहणार आहेत.