जिल्ह्यातील पाणीप्रश्नावर बैठकीत चर्चा झाली. टंचाई असलेल्या भागात आढावा बैठक घेऊन प्रलंबित कामे पूर्ण करून टंचाई भासणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी. शेतकऱ्यांना पीककर्ज व पीक विमा वेळेत देण्यासाठी तातडीने बैठक घ्यावी, शेतकऱ्यांना बी-बियाणे वाटपाचे योग्य नियोजन करून वेळेत उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
ग्रामपंचायत स्तरावर १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शासन निर्णयाप्रमाणे नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ५ टक्के निधी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर खर्च करण्याचेही निर्देशही बैठकीत देण्यात आले. पशुसंवर्धन विभागांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना कोरोना सुरक्षा कवच विमा योजना काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेसमधून प्रत्येकी ३०० रुपये खर्चून विमा काढण्याचा निर्णयही घेण्यात आला. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी मसुरी येथील आयएएस प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. बैठकीस सभापती बाळासाहेब रावणगावकर, संजय बेळगे, विजय धोंडगे, पूनम पवार, संतोष राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी सुधीर ठोंबरे आदींची उपस्थिती होती.
चौकट - अनुपस्थित विभागप्रमुखांवर कारवाई होणार
जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन झालेल्या स्थायी समिती सभेला काही खातेप्रमुख सहभागी झाले नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून खातेप्रमुखांनी सभेस वेळेवर उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. यापुढे जि.प.च्या बैठकांना वेळेवर उपस्थित न राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी घुगे यांना सूचना केल्या.