किनवट : तालुक्यातील १५ पशुधन पर्यवेक्षक व ३ सहायक पशुधन विकास अधिकारी प्रलंबित मागण्या घेऊन १५ जूनपासून असहकार आंदोलनात सहभागी झाल्याने, मान्सूनपूर्व लसीकरण व इतर कामावर आंदोलनाचा परिणाम झाला आहे. पावसाळ्याचे दिवस अन् पशुधन पर्यवेक्षक व सहायक पशुधन विकास अधिकारी यांचे आंदोलन, यामुळे १ लाख ५ हजार ९८४ पशुधनाच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सहा.आयुक्त पशुसंवर्धन विकास अधिकारी गट अ सेवा प्रवेश नियम सुधारणा करणे, पशुधन विस्तार अधिकारी गट अ पंचायत समितीच्या पदनामात बदल करून, पशुसंवर्धन अधिकारी गट अ पंचायत समिती करणे, पशुधन पर्यवेक्षक सहा.पशुधन विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या पदोन्नतीच्या वेतन निश्चितीत सुधारणा करणे या व इतर मागण्या घेऊन पशुचिकित्सक व्यवसाय संघटना महाराष्ट्र यांनी असहकार आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार, किनवट तालुक्यातील सहा.पशुधन विकास अधिकारी ३ व पशुधन पर्यवेक्षक १५ असे १८ जण आंदोलनात सहभागी झाल्याने, लसीकरण, सर्व ऑनलाइन मासिक, तसेच वार्षिक अहवाल बंद राहणार आहे, तसेच आढावा बैठकीला हजर राहणार नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे. पशुधन पर्यवेक्षक हे श्रेणी २च्या दवाखान्याचे संस्थापक प्रमुख म्हणून असल्याने तेथील सर्व सेवा ठप्प झाली आहे. १५ ते २५ जून असहकार आंदोलन,२५ जून रोजी विधानसभा सदस्यांना निवेदन देण्यात येणार आहे. मागण्या मान्य झाल्या नाही, तर १६ जुलैपासून कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे, असे संघटनेचे जी.वाय. कदम यांनी सांगितले.