नांदेड : गेल्या आठ महिन्यांपासून शहरात कापडी पिशव्या वाटपाचा विषय गाजत आहे़ खुद्द पर्यावरण मंत्री रामदास कदम हे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अद्यापही नांदेड शहरात कापडी पिशव्या वाटपाची अंमलबजावणी झाली नाही़ त्यात या पिशव्या निर्मितीच्या कामाचा वेग हा अतिशय कमी असल्यामुळे महापालिका आयुक्त लहूराज माळी यांनी कापडी पिशव्या तयार करणाऱ्या दोन्ही ठेकेदारांना नोटीसा बजाविल्या आहेत़ तसेच कारवाईचा इशारा देण्यात आला आहे़पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्लास्टीक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे पालकत्व असलेल्या नांदेड जिल्ह्यात या निर्णयाची कशारितीने अंमलबजावणी करण्यात येते़ याकडे सर्वांचे लक्ष लागले होते़ त्यात महापालिका हद्दीत कापडी पिशव्या वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ त्यावेळी कापडी पिशव्यांच्या कंत्राटाचा तिढा अनेक दिवस सुटला नव्हता़अनेक दिवस निविदा प्रक्रियेतच या कापडी पिशव्या अडकल्या होत्या़ त्यानंतर कापड पुरवठा करणारा आणि कापडी पिशव्या शिवणारा अशा दोन कंत्राटदारांना हे काम देण्यात आले होते़ त्यानंतर त्यांनी काही कापडी पिशव्या शिऊन त्याचा नमुना आयुक्तांना दाखविला होता़ परंतु कंत्राटदाराने नमुना म्हणून दिलेले कापड आणि शिवलेल्या कापड्यांच्या पिशव्या एकच आहेत की नाही़ याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते़ त्यामुळे कापड तपासणीचे काम हे एसजीजीएस या संस्थेकडे देण्यात आले़ या संस्थेकडून या कापडांची तपासणी सुरु करण्यात आली आहे़परंतु कापडी पिशव्या शिवण्याची गती मात्र वाढत नसल्यामुळे याबाबत आयुक्त लहूराज माळी यांनी नाराजी व्यक्त केली होती़ याबाबत आयुक्तांनी आता कापड पुरवठा करणारा आणि कापडी पिशव्या शिवणारे या दोघांनाही नोटीसा बजाविल्या आहेत़ कामाची गती न वाढविल्यास कारवाईचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे़आतापर्यंत फक्त ४०० पिशव्याच शिवल्यागेल्या आठ महिन्यांपासून कापडी पिशव्या वाटपाचा घोळ सुरु आहे़ कंत्राटदाराला महापालिका हद्दीत वाटप करण्यासाठी ३ लाख कापडी पिशव्या शिवण्याचे उदिष्ट आहे़ परंतु आतापर्यंत केवळ ४०० पिशव्याच शिवण्यात आल्या आहेत़ त्यामुळे पर्यावरणमंत्री यांचे पालकत्व असलेल्या नांदेडात ३ लाख पिशव्या कधी शिवल्या जाणार अन् त्यांचे वाटप होण्यासाठी आणखी किती महिने जाणार हा संशोधनाचा विषय आहे़
कापडी पिशव्यांच्या ठेकेदारांना नोटीसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:12 AM