नांदेड : नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरिता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत सोशल मिडियावरुन उमेदवारांचा व पक्षाचा प्रचार करणा-या अॅडमीन व उमेदवारांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी नोटीसा बजावल्या आहेत.सोशल मिडियावर नजर ठवेण्यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून वरील सर्व प्रसार माध्यमांवर करडी नजर ठेवली जात आहे.या प्रक्रियेत उमेदवारांना मतदान करण्याविषयी करण्यात आलेले आवाहन याबाबत तपासण्या करण्यात आल्या. या तपासणीत शैलेश नंदकुमार मुखेडकर यांनी वायजर टेक्नॉलॉजी, नांदेड येथून भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी एकत्रित संदेश वितरीत केले आहेत. माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीने हे संदेश पकडले आहेत. त्यानुसार मुखेडकर यांनी समितीची पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे उघड झाले आहे. संबंधित उमेदवारांनी खर्चात या प्रकरणी नोंद केली नसल्याचेही लक्षात आले आहे.व्हॉट्सअप परिवर्तन ग्रुपवरुन कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी बैठक बोलविल्याचा संदेश देण्यात आला होता. या प्रकरणी ग्रुप अॅडमीन डॉ. मनीषा कागडे तसेच सकल मराठा शिवजन्मोत्सव ग्रुपवरुन कॉंग्रेस उमेदवाराच्या विजयी करण्यासंदर्भातला संदेश देण्यात आला होता. या ग्रुपमधील डॉ. स्मिता गायकवाड, जयश्री पावडे, व्यंकटेश मंगनाळे, संगीता पाटील, प्रतिमा पाटील, सुरेखा रावणगावकर, राजश्री मिरजकर, अविनाश कदम पाटील यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. तसेच फेसबुकवरुन विविध उमेदवारांना निवडून देण्यासंदर्भात प्रचार करण्याच्या पोस्ट टाकल्या आहेत.अशा युझरकत्यांना या समितीने नोटीसा बजावल्या आहेत. प्रभाकर पांडे, वंचित बहुजन आघाडी नांदेड आॅफिशियल फेसबुक, नांदेड सोशल मिडीया भाजपा यांचा त्यात समावेश आहे.
सोशल मीडियावरुन प्रचार केल्याप्रकरणी नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 12:28 AM