या उपक्रमात शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत कसा पोहोचविता येईल यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. नागरिकांची कामे विविध विभागाशी संबंधित असल्याने त्यांना कामे पूर्ण होण्यासाठी विविध कार्यालयांमध्ये जावे लागते. नागरिकांची कामे तसेच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागाचा एकमेकांशी आणि नागरिकांशीही परस्पर समन्वय असणे आवश्यक आहे. त्यामुळे मंडळ स्तरावर तालुकास्तरीय विविध यंत्रणा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन नागरिकांच्या विविध अडचणी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यासाठी व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात प्रशासन आपल्या गावी हा उपक्रम मंडळस्तरावर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी २९ जानेवारीपासून दर शुक्रवारी मंडळ स्तरावर एका गावात पोहोचतील. तेथे योजनांची अंमलबजावणीबाबत माहिती दिली जाईल. हा कार्यक्रम मंडळ मुख्यालयात जिल्हा परिषद शाळा अथवा इतर सार्वजनिक ठिकाणी होणार आहे. सर्व विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी यावेळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. या उपक्रमाचे सनियंत्रण हे उपविभागीय अधिकारी करतील.
या उपक्रमांतर्गत मंडळनिहाय शिबिरांचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. संपूर्ण वर्षभराचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. तालुकानिहाय व गावनिहाय हा आराखडा तयार झाला आहे. जिल्ह्यातील संपूर्ण १६ तालुक्यात या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दर शुक्रवारी हा उपक्रम झाल्यानंतर सर्व यंत्रणा अधिकाऱ्यांना आपल्या विभागाची माहिती तहसीलदारांकडे सादर करावयाची आहे. तहसीलदारांनी हा मूल्यमापन अहवाल सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे तसेच तालुका सनियंत्रण समितीकडे सादर करणे बंधनकारक आहे.
चौकट - जिल्हा व तालुकास्तरीय सनियंत्रण समिती
‘प्रशासन आपल्या गावी’ या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर सनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतील. उपाध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी, उपवनसंरक्षक आहेत. अप्पर जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख, शिक्षणाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, अधीक्षक अभियंता महावितरण आदी अधिकारी हे सदस्य राहणार आहेत. तालुकास्तरीय समितीत उपविभागीय अधिकारी अध्यक्ष, तर जिल्हा परिषदेतील एक वरिष्ठ अधिकारी, तालुक्याचे उपविभागीय कृषी अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, महावितरणचे कार्यकारी अभियंता हे अधिकारी सदस्य म्हणून काम पाहतील.