नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कर्नाटकाच्या निवडणुकीत बजरंग दलावर टीका केली. बजरंग दल हा सेवाभावी वृत्तीने काम करतो. त्यामुळे चव्हाणांनी केलेली टीका त्यांना अडचणीची ठरणार असून, ते या टीकेमुळे आजीवन काँग्रेसमध्येच राहतील, असे दिसून येत असल्याचे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
अशोकराव चव्हाण हे भाजपच्या संपर्कात नाहीत. काही महिन्यांपूर्वी अधिवेशनादरम्यान त्यांची आणि माझी भेट झाली होती. सध्या तरी चव्हाणांच्या भाजप प्रवेशाच्या कोणत्याही हालचाली नाहीत. परंतु, कर्नाटक निवडणुकीत त्यांनी बजरंग दलावर केलेली टीका त्यांना चांगलीच अडचणीची ठरू शकते. यापूर्वी लोकसभेत त्यांचा पराभव झाला आहे. आता बजरंग दलाचे सेवक पुन्हा एकदा त्यांच्या पराभवासाठी तुटून पडतील, असेही बावनकुळे म्हणाले. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी चार दिवसांत सत्ताधाऱ्यांचे ढोलताशे बंद होतील, असे वक्तव्य केले होते. वडेट्टीवारांना मंत्रिपदाचे स्वप्न पडत आहेत. परंतु, आता ते खूप दूर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला काही अर्थ उरत नाही, असेही बावनकुळे म्हणाले.