नांदेड: शहरात स्वच्छता अभियानाला गती देण्यासाठी महापालिकेने मोबाइल अॅपद्वारे आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक व इतर कर्मचा-यांना निर्देश दिले आहेत़ त्यामुळे नांदेडकरांना आता अस्वच्छतेची तक्रार अॅपद्वारे थेट मनपा प्रशासनाकडे करता येणार आहे़ या अॅपचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे़
शहरातील स्वच्छताविषयक सेवांच्या तक्रारीचा निपटारा नागरिकांना आपल्या मोबाइलद्वारे करता यावा यासाठी केंद्र शासनाने स्वच्छता हे मोबाईल अॅप प्लेस्टोअरवर उपलब्ध करुन दिले आहे़ नागरिकांनी गुगल प्लेस्टोअरवर जाऊन स्वच्छता असे टाईप करुन हे अॅप्लीकेशन प्रथम डाऊनलोड करुन घ्यावे़ आपली भाषा निवडून मोबाईल क्रमांक तसेच ठिकाण निश्चित करुन आपली तक्रार पोस्ट करावी़ यासाठी प्रथम मोबाईल कॅमे-याद्वारे किंवा गॅलरीतून फोटो निवडावा़ त्यानंतर स्वच्छताविषयक वर्गवारीमधून मृत प्राणी, कचरा पेटीची स्वच्छता आदींची निवड करुन ठिकाण टाकावे.
त्यानंतर आपली तक्रार पोस्ट करावी़ या तक्रारींचा निपटारा स्वच्छता निरीक्षक यांच्यामार्फत होणार असून तक्रारींची माहिती केंद्र व राज्य शासनाकडेदेखील अॅपद्वारे पाठविली जाणार आहे़ महापालिकेने यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करुन अधिकारी, कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले आहे़ नागरिकांनी स्वच्छतेसाठी या आधुनिक तंत्राचा वापर करावा असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे . या अॅपमुळे नागरिकांना आता स्वच्छताविषयक तक्रारीसाठी क्षेत्रीय कार्यालय गाठण्याची आवश्यकता नाही. अॅपमुळे स्वच्छतेच्या कामालाही गती मिळणार असून नागरिकांचा वेळ आणि पैशाचीही बचत होणार आहे़