औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेतील परभणी ते मुदखेड या ८१.४३ कि.मी. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. या दुहेरीकरणामुळे मुदखेड-परभणीदरम्यान रेल्वेगाड्यांना क्रॉसिंगमुळे विलंब होण्याचा प्रकार थांबणार आहे.
परभणी-मुदखेडमधील लिंबगाव-चुडावा-पूर्णा- मिरखेलदरम्यान दुहेरीकरणाचे ३१ कि.मी.चे काम १४ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाले. सुरक्षा आयुक्त राम कृपाल यांनी या नवीन मार्गावर पॅसेंजर ६० किलोमीटर प्रति तासाच्या गतीने चालविण्यास परवानगी दिली आहे. हळूहळू रेल्वेंचा वेग वाढविण्यात येईल. मुदखेड ते परभणी या ८१.४३ किलोमीटरमार्गापैकी ५० किलोमीटरचे काम यापूर्वीच पूर्ण करण्यात आले होते. यातील परभणी ते मिरखेल हे १७ किलोमीटरचे कार्य पूर्ण होऊन जून २०१७ पासून रेल्वे धावत आहेत.
दुसऱ्या टप्प्यात मुदखेड ते मुगट या ९.२६ किलोमीटर मार्गावर आॅक्टोबर २०१८ पासून आणि तिसऱ्या टप्प्यात मालटेकडी ते लिंबगाव या १४.१६ किलोमीटर मार्गावर, तर चौथ्या टप्प्यात मुगट ते मालटेकडीदरम्यान १०.१७ किलोमीटर मार्गावर सप्टेंबर २०१९ पासून रेल्वेगाड्या धावत आहेत. मुदखेड ते परभणी हा पूर्ण ८१.४३ किलोमीटर मार्ग पूर्ण करण्याकरिता ३९१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.
३ जंक्शनवर वाढली रेल्वेंची संख्यामुदखेड ते परभणीदरम्यान ३ जंक्शन येतात. त्यामुळे या भागात रेल्वेंची संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे काही रेल्वेंना क्रॉसिंगमुळे उशीर होत होता. दुहेरीकरणामुळे ही समस्या सुटणार आहे. मिरखेल ते लिंबगाव हे ३१ किलोमीटरचे काम करण्यासाठी ९ दिवस लाईन ब्लॉक घेण्यात आला होता. या कालावधीत रेल्वे प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी प्रवाशांचे आभार मानले आहेत.