विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : इयत्ता अकरावी-बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश ग्रामीण भागातील महाविद्यालयांत घेतला आहे. मात्र महाविद्यालयात न जाता ते खाजगी क्लासेसमध्येच शिक्षण घेत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने आता शहरालगतच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नांदेड जिल्ह्यात चार भरारी पथकांचीही स्थापना करण्यात आली आहे.नांदेडसह लातूर जिल्ह्यात खाजगी क्लासेसचा बोलबाला आहे. शहरालगत असलेल्या अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे प्रवेश नावालाच असून त्यांचा दररोजचा वेळ खाजगी क्लासेसमध्येच जातो. हा प्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाने कडक भूमिका घेतलेली असून कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रीक पद्धतीने घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, शहरालगतच्या अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश झाले असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागाने आता शहरालगतच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची भरारी पथकांच्या माध्यमातून तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.महानगरपालिका क्षेत्राजवळच्या ग्रामीण भागातील परिसरामध्ये म्हणजेच मनपा क्षेत्रापासून १० कि.मी. ंअंतरावर असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत किंवा कसे? हे या माध्यमातून तपासण्यात येणार आहे. यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कमीत कमी चार भरारी पथके स्थापन करण्याचे आदेश शिक्षण विभागाने बजावले आहेत. सदर भरारी पथकांमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांसह तीन मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांचा समावेश असणार आहे.ही भरारी पथके मनपा क्षेत्रापासून १० कि.मी. अंतरात असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात जावून शाळांना भेटी देणार आहेत. याबरोबरच संच मान्यतेनुसार मंजूर तुकड्या, अधिकतम प्रवेशक्षमता, शाखानिहाय दिलेले प्रवेश तसेच प्रवेशानुसार विद्यार्थी महाविद्यालयामध्ये उपस्थित राहतात का? याची पडताळणी करणार आहेत. ज्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक मुलांना प्रवेश दिल्याचे स्पष्ट होईल, अशा उच्च माध्यमिक व कनिष्ठ माध्यमिक विद्यालयांंची यादी विभागीय शिक्षण उपसंचालकांना सादर करण्यात येणार असून विभागीय उपसंचालकांमार्फत ती यादी शासनाकडे जाणार आहे.ज्या महाविद्यालयांनी प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे त्या उच्च माध्यमिक विद्यालयांनी त्यांच्या स्तरावरुन अतिरिक्त विद्यार्थ्यांचे प्रवेश तात्काळ रद्द करायचे आहेत. तसेच प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना सोयीनुसार नजीकच्या मंजूर प्रवेशित क्षमतेच्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेण्यास सांगायचे आहे. एखाद्या विद्यालयाने प्रवेशक्षमतेपेक्षा जादा प्रवेश दिलेला असल्यास सदर विद्यार्थ्यांना येणाºया इयत्ता बारावीच्या परीक्षेस बसता येणार नसल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. ग्रामीण भागात माध्यमिकला जोडून असलेल्या महाविद्यालयात ८० प्रवेश क्षमता मंजूर आहे़ तर स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय किंवा वरिष्ठला जोडून असणाºया महाविद्यालयातील अकरावी, बारावीच्या सर्व शाखांना १२० विद्यार्थ्यांची क्षमता आहे़ मंजुरी नसताना यापेक्षा अधिक विद्यार्थी या पथकाच्या रडारवर असतील़---विद्यार्थ्यांना आॅनलाईनमधूनच प्रवेशज्या महानगर क्षेत्रामध्ये इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने होत आहे़ त्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश लगतच्या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये घेतले असल्यास आणि सदर उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रविष्ट असल्यास सदर विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश तात्काळ रद्द करुन आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये यावे व त्यामधूनच प्रवेश घ्यावे, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे़ याबरोबरच सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांनी त्यांची ‘सरल’मधील माहिती ३० सप्टेंबरपर्यंत अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले असून उच्च मा़विद्यालयाची मंजूर प्रवेशक्षमता, प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या व विद्यार्थ्यांची सरलमधील माहिती विचारात घेवूनच इयत्ता बारावीच्या परीक्षेचे अर्ज स्वीकारावे असेही स्पष्ट केले आहे़नांदेड जिल्ह्यातील ही महाविद्यालये रडारवरशिक्षण विभागाच्या वतीने भरारी पथकाच्या माध्यमातून नांदेड शहरापासून दहा किमी़ अंतरात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी होणार आहे़ या टप्प्यात काकांडी, लिंबगाव, रहाटी, मुसलमानवाडी, मालेगाव, भोकर फाटा, वासरीपर्यंतच्या महाविद्यालयांची तपासणी होण्याची शक्यता आहे़
आता महाविद्यालयांची पटपडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:45 AM
इयत्ता अकरावी-बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश ग्रामीण भागातील महाविद्यालयांत घेतला आहे. मात्र महाविद्यालयात न जाता ते खाजगी क्लासेसमध्येच शिक्षण घेत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने आता शहरालगतच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नांदेड जिल्ह्यात चार भरारी पथकांचीही स्थापना करण्यात आली आहे.
ठळक मुद्देशिक्षण विभागाकडून चार भरारी पथकांची स्थापना