नांदेड - जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. त्यामुळे रुग्णालयात खाटाही मिळेनाशा झाल्या आहेत. त्यातच कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले ‘रेमडेसिविर’ हे इंजेक्शन अधिक दराने विक्री करण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी शहरात कुठेही हे इंजेक्शन उपलब्ध नव्हते. इंजेक्शनच्या दरात झालेल्या फरकामुळे आता रेमडेसिविरचा काळाबाजार सुरु झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३५ हजारांच्या पुढे गेली आहे तर रुग्णालयात सात हजारांवर रुग्ण उपचार घेत आहेत. यातील अनेक रुग्ण अत्यवस्थ आहेत. या रुग्णांना रेमडेसिविरच्या इंजेक्शनचा डोस देण्याची गरज असते. फुफ्फुसात संसर्ग अधिक असल्यास रुग्णांना किमान सहा डोस द्यावे लागतात. त्यात पहिला डोस २०० एमएलचा असतो. त्यानंतर सलग १०० एमएलचे डाेस द्यावे लागतात. त्यानंतरच तो रुग्ण ठणठणीत होतो. यामध्ये एकाही दिवसाचा खंड पडल्यास पुन्हा पहिले पाढे पंचावन्न करावे लागतात. आजघडीला नांदेडमधील रुग्णालयात हजारो रुग्ण दाखल आहेत. परंतु, त्यांना देण्यासाठी मुबलक प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध नाहीत. प्रिस्क्रीप्शन घेऊन रुग्णांचे नातेवाईक दारोदारी फिरत आहेत. एका रुग्णालयात जर दहा आयसीयू बेड असतील तर सहा दिवसात किमान त्यांना ६० इंजेक्शन लागतात. परंतु, आता रुग्णसंख्या वाढली असून, सर्वच ठिकाणाहून रेमडेसिविरला मागणी होत आहे. त्यातच रेमडेसिविरच्या वाहतुकीमध्ये अडचण आल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा फायदा काही संधीसाधू घेत असून, या इंजेक्शनसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम आकारली जात आहेत.
इन्फेक्शन ९च्या वर गेल्यास वाढतो धोका
कोरोनाबाधित रुग्णाचे सिटीस्कॅन केल्यानंतर त्याच्या फुफ्फुसातील इन्फेक्शन ८च्या खाली असल्यास हा रुग्ण धोक्याबाहेर असतो. ९ ते १६ इंफेक्शन असल्यास अशा रुग्णाला मॉडरेट केले जाते. या रुग्णाला रेमडेसिविर देणे गरजेचे असते. १६च्या पुढे गेल्यास प्रकृती चिंताजनक बनते तर २०च्या पुढे गेल्यास अशा रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. नांदेडात शेजारील आंध्रप्रदेश, तेलंगणा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, लातूर या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे मागणीपेक्षा जास्त इंजेक्शन लागत आहेत.
वाहतुकीत अडचण निर्माण झाल्याने तुटवडा
नांदेडात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच गुरुवारी वाहतुकीत अडचण निर्माण झाल्याने इंजेक्शनचा साठा पोहोचण्यास विलंब झाला. सायंकाळपर्यंत लातूर आणि नागपूर येथून साधारणत: नऊशे इंजेक्शन येणार आहेत तर शुक्रवारी आणखी जवळपास दोन हजार इंजेक्शन मिळतील. विक्रेत्यांनी एका इंजेक्शनमागे १,४०० रुपये आकारावेत, त्यापेक्षा अधिक रक्कम घेऊ नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे डॉ. माधव निमसे यांनी केले आहे.