नांदेड : शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना सन २००५नंतर एन.पी.एस. अर्थात राष्ट्रीय निवृत्ती योजना शासनाने लागू केली आहे. मात्र यापूर्वी असलेल्या डी.सी.पी.एस. योजनेचा हिशोब व अन्य बाबींची पूर्तता न करता नवीन योजनेचे फॉर्म भरण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सदर विषयाच्या आनुषंगाने महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांनी शासनाला पत्र पाठविले आहे. या योजनेचे अर्ज भरण्याच्या पूर्वी सर्वबाबींची पूर्तता करावी, अशी मागणी केली आहे. त्यात राष्ट्रीय निवृत्ती योजनेचे सभासद करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या यापूर्वी जमा झालेल्या रकमांचा पावत्यासह हिशोब, व्याजाची रक्कम, शासन हिस्सा त्यांच्या नवीन खात्यात वर्ग कराव्यात. त्यांना काही शंका असल्यास त्यांचे निराकरण करावे. त्यासाठी संबंधित कर्मचारी व संघटना यांच्याशी चर्चा घडवून आणावी ही सर्व कार्यवाही २८ फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करावी व त्यानंतर त्यांच्याकडून नवीन योजनेचे फॉर्म भरून घ्यावे, असे शासन पत्रात स्पष्ट नमूद आहे. मात्र या निर्देशांना केराची टोपली दाखवत नांदेडसह अनेक जिल्ह्यांत शिक्षकांना फॉर्म भरण्याची सक्ती करत वेतन रोखण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे म्हटले आहे. सदर योजनेच्या जनजागृतीसाठी ऑनलाइन सभा लावावी, पूर्वीचा सर्व हिशोब द्यावा, राष्ट्रीय निवृत्ती योजनेत केंद्र सरकार जे लाभ त्यांच्या कर्मचाऱ्यांना देतात ते लाभ राज्य शासन आम्हाला देणार आहेत की नाही आदीबाबत स्पष्टता करावी. या मागण्यांची पूर्तता करूनच नवीन योजनेचे फॉर्म भरून घ्यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, शिक्षणमंत्री, सर्व विभागांचे प्रधान सचिव यांच्याकडे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर, राज्य नेते विजय भोगेकर, राज्य अध्यक्षा अल्का ठाकरे, राज्य कार्याध्यक्ष बळीराम मोरे, राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे, राज्य प्रमुख संघटक भुपेश वाघ, राज्य उपाध्यक्ष जी. एस. मंगनाळे, राज्यकार्याध्यक्षा सुनंदा कल्याणकस्तुरे, राज्य कोषाध्यक्ष रुखमा पाटील, राज्य प्रमुख संघटक चंदा खांडरे, शिवशंकर सोमवंशी, युसुफ शेख, पी. पी. कौसल्ये, श्रीराम कलणे, ग. नु. जाधव, जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, जिल्हा सरचिटणीस बाबूराव माडगे, विनायक कल्याणकस्तुरे, बळीराम फाजगे, बी. टी. केंद्रे, जी. बी. मोरे, सुरेश मोकले, कविता गरुडकर यांनी केली आहे.
एनपीएससक्ती पूर्वी हिशोबाची पूर्तता होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:18 AM