नांदेड: विहिरीवर पाणी भरत असलेल्या महिलेला वानराने विहिरीत ढकलून दिल्याची घटना किनवट तालुक्यातील नंदगाव येथे सोमवारी सायंकाळी घडली. विहिरी शेजारी असलेल्या नागरिकांनी सतर्कता बाळगत या महिलेला विहिरीच्या बाहेर काढले अन्यथा दुर्दैवी घटना घडली असती.
पल्लवी पंडित तांबारे असे महिलेचे नाव आहे. त्या घरासमोर असलेल्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी पाठीमागून आलेल्या वानराने त्यांना धक्का दिल्याने त्या विहिरीत पडल्या. ही बाब नागरिकांना समजल्यानंतर त्यांनी विहिरीतून महिलेला बाहेर काढले. यामध्ये महिला किरकोळ जखमी झाली असून भयभीत झालेल्या महिलेला उपचारासाठी दवाखान्यात आणून उपचार करण्यात आले.
दरम्यान, इस्लापूर वन विभागाला अनेक वेळा वानराचा बंदोबस्त करा असे ग्रामपंचायतचे ठराव देण्यात आले आहेत. मात्र वन विभाग याकडे दुर्लक्ष करत असून इस्लापूर येथे माकडांचा प्रताप पाहायला मिळत आहे. अनेक महिलांना या वानरांनी जखमी केले आहे. तसेच अनेकांचा चावाही घेतला आहे, वन विभागाने तात्काळ या वानरांचा बंदोबस्त करावा अन्यथा इस्लापूर येथील वन विभागाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा नातेवाईकांनी दिला.