अनुराग पोवळे।नांदेड : जिल्ह्यात दिवाळीनंतर खरीप पिकाच्या काढणीची कामे संपली असून रबीच्या पेरणीतही काही प्रमाणात मजुरांना रोजगार मिळाला. आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आजघडीला जिल्ह्यात १ हजार ३६७ कामांवर १३ हजार ७५९ मजूर आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मनरेगा विभागामार्फत जवळपास २१ हजार कामे तयार ठेवण्यात आली आहेत.जिल्ह्यातील उमरी, मुखेड, देगलूर या तालुक्यांत दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्याचवेळी अन्य १४ महसूल मंडळांतही शासनाने दुष्काळ घोषित केला आहे. देगलूर तालुक्यात केवळ ४० टक्के पाऊस झाला आहे तर मुखेड तालुक्यात ५८ ्रटक्के आणि उमरी तालुक्यात ८२ टक्के पाऊस झाला असला तरी तो वेळेवर पडला नाही. त्यामुळे पिके हातची गेली आहेत. देगलूर तालुक्यात भीषण परिस्थिती आहे. मुखेडमध्येही पिण्याच्या पाण्यासाठी आणि रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर स्थलांतर करावे लागत आहे.या दुष्काळी तालुक्यात तर परिस्थिती बिकट आहे. पण त्यासह कंधार, लोहा, नायगाव, धर्माबाद या तालुक्यांतही पाण्यासह मजुरीचा प्रश्नही बिकट झाला आहे. मजूरदारवर्ग आता मनरेगाच्या कामाकडे वळला आहे. जिल्ह्यात १ हजार ३६७ कामे मनरेगाअंतर्गत सुरू आहे. या कामावर १३ हजार ७५९ मजूर काम करीत आहेत. यात सर्वाधिक १ हजार ८१४ मजूर हे अर्धापूर तालुक्यात १२२ कामांवर आहेत तर त्याखालोखाल नायगाव तालुक्यात १४२ कामांवर १ हजार ७३२, भोकर तालुक्यात ८० कामांवर १ हजार १०५, बिलोली तालुक्यात ६२ कामांवर ४२४, देगलूर तालुक्यात ३६ कामांवर ३७२, धर्माबाद तालुक्यात ३६ कामांवर २००, हदगाव तालुक्यात ५७ कामांवर ६३०, हिमायतनगर तालुक्यात २७ कामांवर ४७७, कंधार तालुक्यात १०२ कामांवर ७०२ मजूर, किनवट तालुक्यात ५५ कामांवर ७५३ मजूर, लोहा तालुक्यात २०६ कामांवर १ हजार ४७२, माहूर तालुक्यात ५९ कामांवर १७७८, मुदखेड तालुक्यात १२९ कामांवर ७७६, मुखेड तालुक्यात ७० कामांवर ४९४, नांदेड तालुक्यात १२३ कामांवर ७८८ मजूर आणि उमरी तालुक्यात ६१ कामांवर ६४२ मजूर कार्यरत आहेत.जिल्ह्यात ग्रामपंचायतस्तरावर ८६२ कामे सुरू आहेत तर यंत्रणांकडून ५०५ कामे केली जात आहेत. ग्रामपंचायती हद्दीअंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये सर्वाधिक कामे नायगाव तालुक्यात आहेत. १४० ग्रामपंचायती अंतर्गत मनरेगाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्या खालोखाल कंधार तालुक्यात ८६ ग्रामपंचायती, मुखेड तालुक्यात ६७, मुदखेड तालुक्यात ६१, भोकर तालुक्यात ६३, बिलोली तालुक्यात ६०, उमरी तालुक्यात ५२, देगलूर तालुक्यात ३२ ग्रामपंचायती अंतर्गत मनरेगाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यंत्रणाच्या कामांची परिस्थिती पाहता लोहा तालुक्यात सर्वाधिक १६५ कामे यंत्रणामार्फत केली जात आहेत. अर्धापूर तालुक्यात १००, नांदेड तालुक्यात ८०, मुदखेड तालुक्यात ६८, कंधार १६, किनवट १३, हदगाव १०, भोकर १७ तर उमरी तालुक्यातील ९ कामे यंत्रणामार्फत केली जात आहेत.मागेल त्याला काम मिळेल -जिल्हाधिकारी४जिल्ह्यात तीन तालुक्यांत दुष्काळ घोषित झाला आहे. त्याचवेळी अन्य तालुक्यांतही पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. या परिस्थितीत रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध करुन देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले. शासनस्तरावरुन अनेक सूचना येत आहेत. त्याचवेळी जिल्हास्तरावरही रोजगार देण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत २१ हजार कामे तयार ठेवण्यात आली आहेत. यामध्ये ग्रामपंचायतस्तरावर १५ हजार तर यंत्रणास्तरावर ५ हजार ७६८ कामे तयार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मागेल त्याला काम देण्याची तयारी प्रशासनाने केली.मजुरांना १५ दिवसांत मजुरीची रक्कम खात्यावर
- जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत ४ लाख ८ हजार २२४ कुटुंबांनी जॉबकार्डसाठी अर्ज केले होते. त्यातील ३ लाख ९५ हजार १३२ कुटुंबांना जॉबकार्ड उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीअंतर्गत २ लाख १९ हजार ७४९ कुटुंब तर अनुसूचित जमातीअंतर्गत ९९ हजार ४६७ कुटुंब आहेत तर अन्य प्रवर्गातील ७ लाख ७४ हजार १७३ कुटुंबांचा समावेश आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत मजुरांची संख्या १० लाख ९३ हजार ३८९ मजूर आहेत. त्यात महिला मजुरांची संख्या ५ लाख १२ हजार ४२३ आहेत.
- यामध्ये कार्यरत मजुरांची संख्या १ लाख ९६ हजार ७७३ इतकी आहे. त्यामध्ये ८४ हजार ९३७ महिला मजूर आहेत. या कार्यरत मजुरांना थेट खात्यावर पैसे दिले जात आहेत. बँक खाते किंवा पोस्ट खात्यामध्ये सदर मजुरांचे खाते आहेत. १५ दिवसांत त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत आहे.