नांदेड : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. त्यामुळे ‘अत्यावश्यक सेवा’वगळता इतर सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत; परंतु त्यानंतरही बँकांसमोरील गर्दी मात्र कमी होताना दिसत नाही. बँकांमध्ये नियमांचे पालन करून सेवा देण्यात येत असली तरी, बँकेच्या बाहेर मात्र नागरिक नियमांचा फज्जा उडवित असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी बँकांतील कर्मचारी बाधित निघाल्याने अनेक दिवस बँक बंद ठेवण्याचा निर्णय अनेक बँकांवर आला होता.
कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत; परंतु ग्राहकांची गैरसोय होऊ नये, आर्थिक व्यवहाराला धक्का लागू नये म्हणून बँका सुरू ठेवण्यात आल्या आहेत; परंतु बँकांनी नियमांचे कठोरपणे पालन करावे, अशी अट घालण्यात आली आहे. त्यानुसार बँकांनी प्रत्येक काैंटरच्या समोर आडोसा उभा केला आहे तसेच मुख्य प्रवेशद्वार बंद करून एकावेळी दोन ते तीन ग्राहकांनाच मध्ये सोडण्यात येत आहे. आतमध्ये काैंटरसमोरील रांगेत सुरक्षित अंतर आहे की नाही? याची सुरक्षा रक्षकांकडून तपासणी करण्यात येत आहे.
परंतु बँकेच्या बाहेर मात्र सर्वत्र गोंधळ सुरू आहे. नागरिक एकमेकांना खेटूनच या ठिकाणी उभे राहत आहेत तर एटीएम आणि कॅश डिपॉझिट मशीनच्या बाहेरही लांबलचक रांगा लागत आहेत. या ठिकाणी सोशल डिस्टसिंगचा पूर्णपणे फज्जा उडविण्यात येत आहेत. यातील अनेकजण तर सर्रासपणे विनामास्क रांगेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
बँकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच प्रत्येक काैंटरसमोर सुरक्षित अंतरासाठी बॅरिकेट लावले आहेत. त्यामुळे ग्राहक आणि बँकेच्या कर्मचारी यामध्ये अंतर राहते तसेच एकाचवेळी दोन ते तीन ग्राहकांनाच आतमध्ये सोडण्यात येत आहे. हे ग्राहक बाहेर पडल्यानंतरही इतर ग्राहकांना आतमध्ये सोडण्यात येत आहे.
-बँक अधिकारी
बँकेत मोजक्याच ग्राहकांना प्रवेश देण्यात येत आहे. बँकेच्या बाहेर सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी सुरक्षित अंतरावर उभे राहण्यासाठी वर्तुळे आखण्यात आली आहेत; परंतु अनेकदा ग्राहकांकडून नियमांचे पालन होत नाही. त्यासाठी सुरक्षा रक्षकाला हस्तक्षेप करावा लागतो. कर्मचारी आणि ग्राहक कोरोना बाधित होऊ नये यासाठी पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे.
- बँक अधिकारी
ग्रामीण भागात बँकेची शाखा नसल्यामुळे शहरात आलो आहे; परंतु या ठिकाणी कोरोनामुळे अनेक तास रांगेत उभे रहावे लागत आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या ग्राहकांना बँकेने अधिक प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी रक्कम काढून रुग्णालयात जमा करावयाची आहे. त्यामुळे विलंब होत आहे.
-रमेश गावडे
बँकेत दररोज पैसे भरण्यासाठी यावे लागते. परंतु या ठिकाणी बँकेकडून मोजक्याच ग्राहकांना आत सोडले जात आहे. तसेच बँकेच्या आतमध्येही कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात येत आहे. बाहेर ग्राहकांच्या रांगा लावण्यात आल्या आहेत. त्यावर सुरक्षा रक्षक लक्ष ठेवून असतात. त्यामुळे कोरोनाचा धोका कमी होतो.
-शंकर स्वामी
जिल्ह्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जवळपास सर्वच आर्थिक व्यवहार बंद आहेत. परंतु अत्यावश्यक असल्यासच बँकेची पायरी चढत आहे. परंतु या ठिकाणी नागरिकांना नियमांचे भान राहिले नसल्याचे दिसत आहे. कितीही प्रयत्न केला तरी नागरिक एकमेकांना खेटत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो.
-पंकज भायेकर