सगरोळी : बिलोली तालुक्याच्या सगरोळी परिसरातील ग्रामीण भागात इच्छुकांना ग्रामपंचायत निवडणुकांचे वेध लागले आहे. आयोगाने अद्याप सरपंचांच्या निवडीबाबत घोषणा केली नसल्याने इच्छुकांमध्ये संभ्रम दिसून येत आहे.
कोरोनामुळे सुरू झालेली ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर शासनाने प्रशासक नेमले. आता अनलाॕॅक प्रक्रिया सुरू झाल्याने निवडणूक आयोगानेही हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य व इतर लोकप्रतिनिधींचे या निवडणुकांवर बारीक लक्ष आहे. ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी पक्षीय खलबते सुरू झाली आहेत. अनेक गावपुढारी तयारीला लागले आहेत.
यापूर्वी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर कोरोनामुळे ही निवडणूक लांबणीवर पडली होती. आता पुन्हा निवडणुकांची रंगत वाढली आहे. ग्रामीण भागात चावडीवर, ओट्यावर, पारावर, हाॕॅटेलमध्ये, शेकोटीसमोर चर्चा सुरू झाल्या आहेत. गावपुढारी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध युक्त्या व फंडे अवलंबित आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात निवडणुकांची चर्चा रंगत आहे. एकप्रकारे ऐन थंडीच्या दिवसांमध्ये शेकोटीजवळ व इतर ठिकाणी गावातील राजकीय वातावरण तापत आहे. मात्र, सरपंचपदाची निवड थेट जनतेतून होणार की सदस्य निवडणार, याबाबत संभ्रम आहे. अनेक ठिकाणी यावरून कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. सर्वांचे लक्ष राजकीय चर्चेसोबत निवडणूक आयोगाच्या घोषणेकडे लागले आहे.