दिलीपसिंह कॉलनीत विजेचा लपंडाव
नांदेड : शहरातील दिलीपसिंह कॉलनीत गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. कोरोना, लॉकडाऊनमुळे घरात बसण्याची वेळ अनेकांना आली. दुसरीकडे वीज कधी जाईल याचा नेम राहिला नाही. याबाबत संबंधित अभियंत्यांना विचारले जाते. मात्र, मोबाईल उचलत नसल्याच्या तक्रारी आहेत.
अंडी विक्री वाढली
हदगाव : कोरोना काळात कोरोनाबाधित रुग्णांना अंडी पोषक असल्याने अनेकजण अंडी विकत घेत आहेत. तसेच अनेकजण कोरोनामुळे अंडी खाण्यावरही भर देत आहेत. गावरान अंडी खाण्याकडे अनेकांचा कल आहे. मागणी वाढल्याने अंड्यांचे दरही वाढले आहेत.
मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या वाढली
हिमायतनगर : लाॅकडाऊन असतानाही मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून सकाळच्या प्रहरी अनेकजण बाहेर फिरावयास निघत आहेत. तसेच काही तरुण सुसाट वेगाने दुचाकीही चालवीत आहेत. अशांना पोलिसांनी खाक्या दाखविण्याची गरज आहे.
शिवभोजन केंद्रावर लाभार्थ्यांची गर्दी
धर्माबाद : येथील शिवभोजन केंद्रावर शनिवारी दुपारी लाभार्थी नागरिकांची मोफत भोजनाची गर्दी झाली होती. या भागात काम करणाऱ्या मजुरांसह लाभार्थ्यांसाठी शिवभोजन केंद्र सोयीचे असल्याने लाभार्थी मोठ्या प्रमाणावर येत आहेत.
वीज बिल वेळेवर मिळेनात
बिलोली : शहरी भागातील अनेक वसाहतीमध्ये विजेची बिले वेळेवर घरपोहोच मिळत नाहीत. वीज भरण्याची तारीख निघून गेल्यावर बिले हाती पडत आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. महावितरण विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
भोकरमध्ये गुटखा जप्त
भोकर : शहरातील आंबेडकर चौक येथे शुक्रवारी अवैध गुटख्याचा साठा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. फौजदार राणी भोंडवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. यामध्ये २२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुकानदार शेख रज्जाक शेख हबीब याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
राजीव गांधी यांना अभिवादन
किनवट : तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी गिरीष नेम्मानीवार, आशिष कऱ्हाळे, उपाध्यक्ष अभय महाजन, जावेद आलम, वसंत राठोड, सय्यद अन्वर सय्यद फकरोद्दीन, स्वामी कलगोटवाड, फारुख, चव्हाण, माधव खेडकर उपस्थित होते.
किसान ब्रिगेडचे निवेदन
माहूर : तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही या संदर्भात संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात यावे, अशी मागणी माहूर तालुका किसान ब्रिगेडचे जिल्हा संघटक अविनाश तनमने यांनी केली. यावेळी विलास डाळंबे, सुनील वानखेडे, विनोद खुपसे, आगाखाँ पठाण, जियाखाँ फारुखी, विष्णू खराटे, नरेंद्र तनमने, राजू शेंडे, संतोष हिंगाडे, प्रवीण मार्कंड, अविनाश पवार, आदी उपस्थित होते.
गाळ काढण्याच्या कामाची पाहणी
हदगाव : तालुक्यातील मनाठा गावालगत गाळ काढण्याचे काम सुरू झाले. उपविभागीय अधिकारी जीवराज डाबकर यांनी तलावाची पाहणी केली. यावेळी विशाल शिंदे, उपसरपंच मारोती बोईनवाड, मंडळ अधिकारी कावळे, तलाठी तेजस कुलकर्णी, माजी सरपंच सुहास शिंदे, साहेबराव पाटील यांची उपस्थिती होती.
ग्रामपंचायतीकडून विहिरीची स्वच्छता
मुखेड : कबनूर, ता. मुखेड येथील सार्वजनिक विहिरीची साफसफाई ग्रामपंचायतीकडून केली जात आहे. तहसीलदार काशिनाथ पाटील, गटविकास अधिकारी भालके यांनी विहिरीची पाहणी करून सरपंच, उपसरपंच यांना धन्यवाद दिले. दोन दिवसांपूर्वी सरपंच रामदास वाघमारे यांनी विहिरीची स्वच्छता करण्याचा उपक्रम राबविला.
आखाडा जळून नुकसान
हदगाव : तालुक्यातील येवली येथील शेतकऱ्याचा आखाडा जळून साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले. एक बैल जखमी झाला. शुक्रवारी ही घटना घडली. अल्पभूधारक शेतकरी मारोती माने यांचे शेत पिंपळगाव शिवारात आहे. शुक्रवारी दुपारी शेतातील आखाड्याला आग लागली. आगीत खताची पोती, ठिबक सिंचन संच, पाईप, कडबा, पत्रे, बैलगाडी, आदी साहित्य जळून साडेतीन लाखांचे नुकसान झाले. तसेच एक बैलही किरकोळ जखमी झाला.
लसीकरणाला प्रतिसाद
हदगाव : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कवाना उपकेंद्रात ४५च्या वरील वयोगटातील व्यक्तींना दीड महिन्यापासून लसीकरण सुरू आहे. नागरिकांनी लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला. आरोग्य सेविका सिंबटवाड, आडे, आशा सेविका फुले, कंधारे यांनी घरोघरी जाऊन मार्गदर्शन करून लस सुरक्षित असल्याचे सांगितले. ६० जणांनी लस घेतली.
विजेच्या तारा लोंबकळल्या
हदगाव : हदगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळल्या आहेत. रस्त्याच्या कडेवरील डीपीही उघडे असल्याने भीती निर्माण झाली. शेतमजुरांच्या जिवाला धोका निर्माण झाला. महावितरणचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. डोंगरगाव, ता. हदगाव येथील शेतकरी रामराव गुरुजी यांच्या शेतातील विजेच्या खांबावरील तारा अक्षरश: लोंबकळत असून, जमिनीला टेकत आहेत. या तारा सहज हाताला लागतील अशा आहेत.