माहूर तालुक्यातील साकुर येथे ७ जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय सभा घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ग्रामीण भागात घरकुलांचे काम सुरू असून, मिशन मोडमध्ये ही कामे पूर्ण करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. आपल्याकडे कामे झालेली आहेत. परंतु झालेली कामे ऑनलाईन केली नसल्यामुळे प्रगती दिसून येत नाही. त्यासाठी झालेल्या कामांचे त्याचवेळी ऑनलाईन होणे आवश्यक आहे.
युडायसप्रमाणे शाळांचे रेकॉर्ड राहणार आहे. त्यामुळे शाळास्तरावरील माहिती युडायसमध्ये व्यवस्थित भरावी. गावातील अंगणवाड्या शाळांशी जोडल्या जाव्यात, यावर भर देण्यात यावा. विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी करणे आवश्यक आहे. पूर्वी राहिलेले व आता नव्याने शाळा प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागास पाणी पुरवठा योजना राबवून वैयक्तिक नळ जोडणीव्दारे प्रतिमाणसी प्रतिदिन ५५ लीटर पाणी पुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाने गावस्तरावर नियोजन करून ग्रामीण भागातील कुटुंबांना वैयक्तिक नळ जोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना वर्षा ठाकूर यांनी केल्या. यावेळी त्यांनी महिला व बाल विकास, महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नरेगा, कृषी, ग्रामपंचायत, समाजकल्याण, पशुसंवर्धन, पाणी पुरवठा, स्वच्छ भारत मिशन, शिक्षण विभाग आदी विभागांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला परिवीक्षाधीन आयएएस अधिकारी कार्तीकेयन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रावसाहेब कोलगणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, व्ही. आर. पाटील, महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद वाघमारे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदुरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर, डॉ. अरविंद गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रकाश रायभोगे, नीला, ए. एन. राजभोज, चितळे, कृषी अधिकारी भाग्यश्री भोसले यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व गटविकास अधिकारी यांची उपस्थिती होती.