नांदेड : एकीकडे तेलाचे भाव भडकले असताना दुसरीकडे सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस घट सुरू आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. तर खाद्यतेलाचे भाव १४० ते १४५ रुपयांवर पोहोचल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
मागील काही दिवसांपासून सोयाबीन काढणी सुरू असून, विक्रीसाठी शेतकरी मार्केटमध्ये आणत आहेत. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात झालेल्या लिलाव बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनला ३,६०० ते ३,७०० रुपये क्विंटल भाव मिळत आहे. गेल्या पंधरा दिवसांत सोयाबीनचे भाव ८०० ते ९०० रुपयांनी पडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. जिल्ह्यात यावर्षी चार लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. पिकांची स्थितीही चांगली होती. पण, सप्टेंबर महिन्यात सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पाऊस व अतिवृष्टीने सोयाबीन पीक अक्षरश: मातीमोल झाल्याचे पाहायला मिळाले.
अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचले होते. तर काही शेतकऱ्यांचे सोयाबीन पुरात वाहून गेले होते. त्याचा मोठा फटका सोयाबीन उत्पादकांना बसला. अनेकांनी खत, बियाणांसाठी टाकलेला खर्चही निघाला नाही. त्याचा परिणाम सोयाबीनच्या गुणवत्तेवर झाला आहे. ज्या शेतकऱ्यांना उरलेसुरले कसेबसे सोयाबीन हातात पडेल, असे वाटत असताना पुन्हा परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने मळणीसाठी शेतात ढीग मारून ठेवलेले सोयाबीन भिजून गेले. त्यामुळे आणखी गुणवत्तेवर परिणाम जाणवणार आहे. जिल्ह्यात महसूल व कृषी विभागाकडून सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाच्या नुकसानीचा सर्व्हे करण्यात आला होता. पण, शनिवार, रविवारी झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे काय ? असा सवाल शेतकरी विचारताहेत.
परतीच्या पावसाने केला शेतमालाचा खराबाजिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने काढणीला आलेली शेतीपिके भिजल्याने काळवंडली आहेत. त्याचा उत्पादनावर परिणाम होणार असून दरही कमी मिळतील. गेल्या अनेक वर्षांत यावर्षी पहिल्यांदाच परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील दहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे.