विहिरीच्या कारणावरून मारहाण
मुखेड : मुखेड तालुक्यातील हिप्पळनारी येथे विहिरीच्या कारणावरून मारहाण झाल्याची घटना घडली. व्यंकट नागरवार हे शेतातील गट क्रमांक ७३ मध्ये धुऱ्यावरील विहीर जेसीबीच्या सहाय्याने बुजवत होते. यावेळी काही आरोपी तेथे आले व त्यांनी नागरवार यांना मारहाण केली. १ मे रोजी सकाळी ही घटना घडली. पोलीस तपास करीत आहेत.
दोन आरोपी अटकेत
माळाकोळी : चौंडी येथील सामाजिक कार्यकर्ते शिवदास ढवळे आत्मदहन प्रकरणी माळाकोळी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. ज्ञानेश्वर गीते व गोविंद केंद्रे अशी आरोपींची नावे आहेत. २८ एप्रिल रोजी ढवळे यांनी आत्मदहन केले होते. या प्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात सहा जणांविरूद्ध गुन्हा नोंदविला होता. चौघे अद्यापही फरार आहेत.
व्यापाऱ्यांना फटका
देगलूर : लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना फटका बसत आहे. अनेक व्यापारी दुकान बंद करून बसले आहेत. अनेक दुकाने खासगी फायनान्स व सावकारी कर्ज काढून उभारण्यात आली. त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करायची या चिंतेत अनेकजण आहेत. दुकाने चालू असतील तर सर्व व्यवहार सुरळीत होतात. मात्र, दुकाने बंद असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
सुभाष चोपडे यांना पदोन्नती
कंधार : कुरुळा पोलीस चौकीतील हवालदार सुभाष चोपडे यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती मिळाली. कुरुळा चौकीत गेल्या वर्षभरापासून चोपडे कार्यरत आहेत. ३ मे रोजी पोलीस निरीक्षक संग्राम जाधव, विठ्ठल गंगलवाड यांच्या उपस्थितीत १ स्टार व फीत लावून चोपडे यांना पदभार देण्यात आला.
कोरोना योद्ध्यांचा गौरव
धर्माबाद : येथील युवक काँग्रेसच्यावतीने कोरोना काळातील योद्ध्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास पोलीस निरीक्षक मोहन माच्छरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शेख इकबाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मीनारायण केशटवार, डॉ. प्रवीण कांबळे, डॉ. पूजा आरटवाड, डॉ. शिवप्रेमा विभुते, डॉ.प् रदीप मॅकलवार, डॉ. तानूरकर, गोविंद पाटील रोशनगावकर, निलेश पाटील, हणुमंत पाटील, बंडू पाटील, विठ्ठल कोंडलवाडे, ताहेर पठाण, राजू सुरकुटवार, शिवराज गायकवाड, कृष्णा तिम्मापुरे, पी. जी. मिसाळे, सतीश शिंदे आदी उपस्थित होते.
वादळी वाऱ्यासह पाऊस
बिलोली : तालुक्यातील अर्जापूर परिसरात २ मे रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने मोठे नुकसान झाले. अर्जापूर, सुलतानपूर, नागापूर, कोंडलापूर, माचनूर, बावलगाव आदी ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. जवळपास अर्धा तास पावसाने झोडपून काढले. वीजपुरवठाही खंडित झाला होता.
निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरण
उमरी : गोदावरी शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरण ऑनलाईन पार पडले. स्पर्धेमध्ये माया हैबते, श्राव्या मोरे, सुप्रिया खंडेलोटे, श्वेता अमृतवाड, सम्राट खंडेलोटे, रेहान शेख जमीर यांनी यश मिळविले. यशस्वीतांना माजी सभापती शिरीष गोरठेकर, डॉ. विक्रम देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शंकर देशमुख, सतीश देशमुख, विश्वजीत देशमुख, रामू रेड्डी, नारायण यम्मेवार, रमीज बेग, गंगाधर शिगळे, रमेश उडतेवार, दिगंबर इंगळे, केदार अमृतवाड, संभाजी जाधव, संजय कवडीकर, प्रवीण खंडेलोटे आदी उपस्थित होते.
वीज कोसळून गाय ठार
लोहा : तालुक्यातील शिवणी जामगा परिसरात २ मे रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. यावेळी वीज कोसळून गाय जागीच ठार झाली. गाय झाडाखाली बांधलेली होती. दुपारी ३ वाजता ही घटना घडली.
गोळ्या व औषधी भेट
किनवट : जलधारा प्राथमिक आरोग्य केंद्राला बालाजी आलेवार यांच्याकडून गोळ्या व औषधी भेट देण्यात आल्या. आलेवार भाजपा तालुका सरचिटणीस आहेत. यापूर्वी त्यांनी इस्लापूर, शिवणी, अप्पारावपेठ या प्राथमिक आरोग्य केंद्रांना कोरोना आजारावरील सहा हजार गोळ्या स्वखर्चातून उपलब्ध करून दिल्या होत्या.
लुंगारे यांना पदोन्नती
इस्लापूर : येथील पोलीस उपनिरीक्षक अंकुश लुंगारे यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. लुंगारे यांच्याकडे शिवणी बीटची जबाबदारी होती. १ मे रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी लुंगारे यांचा गौरव केला. तर इस्लापूरचेच कर्मचारी प्रकाश हाके यांची जमादार म्हणून पदोन्नती झाली आहे.
ताप, सर्दीचे प्रमाण वाढले
किनवट : शिवणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने ताप, सर्दीचे प्रमाण वाढले आहे. अशक्तपणाच्या तक्रारीही वाढल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण घाबरून खासगी रुग्णालयात धाव घेत आहेत. या सर्व आजारांवर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कानीफनाथ मुंडे, डॉ. पोगे, डॉ. टोम्पे व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.