त्यादरम्यान झालेल्या राजकीय घडामोडीनंतर काँग्रेसचे प्राचार्य राजेंद्र केशवे माहूरचे नगराध्यक्ष बनले. पुढील अडीच वर्षांच्या टर्ममध्ये काँग्रेसच्या गौतमी कांबळे नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शोभाताई महामुने उपनगराध्यक्ष झाल्या. नगरपंचायतच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ८, शिवसेना ४, काँग्रेस ३, भाजप व एमआयएम यांचा प्रत्येकी १ नगरसेवक निवडून आला. एमआयएमच्या एकमेव नगरसेवकाच्या सहकार्याने काँग्रेसला बाजूला ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे फिरोज दोसानी नगराध्यक्ष व राजकुमार भोपी उपनगराध्यक्ष झाले.
या टर्मच्या दुसऱ्या अडीच वर्षांच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कु. शीतल जाधव नगराध्यक्ष व काँग्रेसच्या अश्विनी आनंद पाटील तुपदाळे उपनगराध्यक्ष झाल्या. एकंदरीत नगरपंचायत स्थापनेपासून आजतागायत माहूर शहरावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष समर त्रिपाठी यांनी ऐनवेळी भाजपचे कमळ हाती घेतले तरी त्यांना केवळ एक नगरसेविका निवडून आणता आली व स्वतःला पराभावाची धूळ चाखावी लागली होती. दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत किनवट विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी आ. प्रदीप नाईक पराभूत झाले व शिवसंग्राम भाजपचे भीमराव केराम निवडून आल्याने माहूर शहरात भाजप सध्या जोशात असून, त्याची परिणीती म्हणजे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वीकृत सदस्य म्हणून नगरपंचायतमध्ये प्रवेश केलेले नगरसेवक सागर (गोपू) महामुने यांना भाजपने आपल्या कंपूत घेऊन त्यांना शहराध्यक्षपद बहाल केले, तर त्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेच्या असंतुष्टांना गळाला लावून भाजपवर राष्ट्रीय पातळीपासून लागलेला आयाराम गयारामचा पक्ष म्हणून बसलेला शिक्का माहूर शहरातही बसविण्यासाठी एक टीम कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने आणखी कोणी त्यांच्या गळाला लागेल याची सुतराम शक्यता दिसत नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्ष सावध पवित्रा घेऊन असून, नव्या-जुन्या कार्याकर्त्यांची मोट बांधून ठेवण्यासाठी सजग प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी सार्वत्रिक निवडणुकीला अद्याप एक वर्षाचा कालावधी शिल्लक असला तरी काही इच्छुक मात्र मोर्चे बांधणीला लागलेले दिसून येत असून, प्रत्यक्ष रणधुमाळीला सुरुवात झाल्यानंतर काय काय घडामोडी घडतात याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.