नांदेड : जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदली प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. ही बदली प्रक्रिया आॅनलाईन होणार असून शिक्षकांना जिल्ह्यांतर्गत बदल्यासाठी फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पंचायत समिती स्तरावर हेल्पलाईन सेंटर सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या हेल्पलाईन सेंटरवर जिल्ह्यातील संगणक विभागातील समन्वयकाची नियुक्ती करण्याची सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत ७ एप्रिल पासून आॅनलाईन फॉर्म भरण्यात येत आहेत. संवर्ग १ व संवर्ग २ मध्ये हे फॉर्म भरले जात आहेत. यामध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात शिक्षकांनी राज्य समन्वयकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचवेळी ९ एप्रिल रोजी अव्वर सचिवांनी काढलेल्या आदेशात ज्या शिक्षकांना इंटरनेटच्या तांत्रिक ज्ञानाअभावी बदली संदर्भातील आॅनलाईन अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. अशा शिक्षकांना पंचायत समिती कार्यालयात हेल्पलाईन केंद्र उघडून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या हेल्पलाईन सेंटरवर जिल्ह्यातील संगणक प्रोग्रामर, एमआयएस समन्वयक यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. या हेल्पलाईन सेंटरवर शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, असे अपेक्षित आहेत. त्याचवेळी या सुविधा उपलब्ध करुन दिल्याची माहिती शिक्षकांना द्यावी, असेही सुचित करण्यात आले आहेत.
बदलीसंदर्भात शिक्षकांना सूचनाच नाहीत !जिल्हास्तरीय बदल्या संदर्भात शिक्षकांना थेट राज्यस्तरावरुन सूचना प्राप्त होत आहेत. पण प्रत्यक्षात स्थानिक स्तरावरुन अद्याप कोणतीही नोटीस अथवा माहिती शिक्षकांना दिली नाही. शिक्षणाधिकारी कार्यालय, गटशिक्षणाधिकारी कार्यालय स्तरावरुन कोणतेही पत्र शिक्षकांना अद्याप दिले नाही. राज्यस्तरावरुन प्राप्त झालेल्या माहितीवरुन शिक्षक बदलीसाठी आॅनलाईन अर्ज भरत आहेत. हे अर्ज भरतानाही अडचणी येत आहेत. अर्ज भरल्यानंतर व्हेरिफिकेशन होत नाही. जिल्हा परिषदेने आजपर्यंत अवघड व सर्वसाधारण क्षेत्र असलेल्या गावांची यादी घोषित केली नसल्याने गतवर्षीची यादीच अंतिम समजली जाणार आहे काय? याबाबतही संदिग्धता निर्माण झाली आहे. महिलांना काम करण्यासाठी अवघड गावांची यादी अद्याप जाहीर करण्यात आली नाही. संवर्ग १ ची बदली प्रक्रिया राबवून संवर्ग २ ची बदली प्रक्रिया राबवायची आहे. त्यामुळे वेळ किती जाईल, हेही अनिश्चित आहे. स्थानिक पातळीवरुन बदलीबाबतचे आदेश निघणार का नाही, याकडेही लक्ष लागले आहे.